जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा महापूर
उत्पादकावर फौजदारी कारवाई करा, अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२ मे)
महाराष्ट्रात दूध भेसळीमुळे अनेकांचा मृत्यू व गंभीर आजार यासारख्या अनेक बातम्या आपण रोजच वृत्तवाहिन्याद्वारे ऐकतो पण गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा असाच काहीसा प्रकार पुढे आलेला आहे.जिल्ह्यातील भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब, ऍलर्जी, किडनी, यकृत, हृदयाचे नुकसान, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होत असून कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाच्या उत्पादनात गुंतलेल्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली ने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना केली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून ही संस्था देशातील ४०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ग्राहक जागृती, प्रशिक्षण आणि ग्राहकांच्या समस्या सोडविण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या वर्षी ही संस्था आपले “सुवर्ण महोत्सवी वर्ष” देशभरात साजरे करत आहे. या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यरत आहे.
निवेदनात भेसळयुक्त दुधाबाबत पुढील मुद्दे देण्यात आले आहे.
¶¶¶
१. FSSAI नुसार, देशभरातील सुमारे ७०% दुधाचे नमुने भेसळयुक्त आढळले आहेत.
२. काही राज्यांमध्ये, १०००% दुधाचे नमुने FSSAI द्वारे निश्चित केलेल्या दुधाच्या मानकांशी जुळत नाहीत.
३. FSSAI ने एकूण १७९१ नमुने तपासले आहेत. त्यातील १४% नमुन्यांमध्ये डिटर्जंट पावडर आढळली आहे. त्यापैकी ४६% दुधामध्ये पाण्याच्या भेसळीमुळे घन नॉन-फॅट म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे आणि सुमारे ५४८ नमुन्यांमध्ये स्किम मिल्क पावडर मिसळ केल्याची आढळून आली, त्यापैकी ४७७ नमुन्यांमध्ये ग्लुकोज मिसळले होते. युरिया, डिटर्जंट, शुद्ध तेल, कॉस्टिक सोडा, बोरिक ऍसिड इत्यादींचा वापर करून सिंथेटिक आणि भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात आहेत ही खूप चिंताजनक बाब आहे.
जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत
¶¶¶
मोठे व्यापारी दुधात भेसळ करतात त्यामुळे लहान मुले व सर्वसामान्य नागरिक आजारी पडत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना सर्व बाजारपेठ मोकळीक मिळते आहे. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने भेसळीचा हा व्यापार न थांबता पसरतो आहे. दुधाच्या शुद्धतेसाठी सर्वसामान्य नागरिकांकडे ना वेळ आहे ना साधन. त्यामुळे जनतेला जे काही दूध उपलब्ध होते आहे ते मुकाट वापरतात.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या मागण्या
¶¶¶
१. जिल्ह्यात अन्न तपासणी मोबाईल व्हॅन असावी.
२. दूध आणि खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात यावा.
३. जिल्ह्यात प्रत्येक तहसील स्तरावर नमुने तपासण्यासाठी प्रशासनाकडून एक “मोफत ओपन टेस्टिंग सेंटर” (खुले टेस्टिंग सेंटर) असावे.
४. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात अन्न निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरुन तातडीने कार्यवाही करता येईल.
५. प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती दुधात भेसळीचे प्रमाण आढळून आल्यावर त्याची सोशल मीडिया, वृत्तपत्रे आदींद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक जागरूक होतील.
दूध भेसळीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि ज्या भागात ही भेसळ आढळून येईल त्या क्षेत्राच्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशीही ग्राहक पंचायत ने मागणी केली आहे.
उदय धकाते,जिल्हा सचिव,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोली
¶¶¶
भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. यामुळे पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब, ऍलर्जी, किडनी, यकृत, हृदयाचे नुकसान, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होत आहे.
