२७ जानेवारीला महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन हिंगोलीत
राज्यभरातून शेकडो वृत्तपत्र विक्रेते राहणार उपस्थित

लोकशाही न्युज,हिंगोली (दि.२३ जानेवारी)
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दि. २६ व २७ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन व आमसभा महावीर भवन, रामलिला मैदानासमोर, हिंगोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे अशी माहीती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी शेकडो वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकूळे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडआण्णा खोत, राज्य संघटना व्यवस्थापन समिती सदस्य संजय पावसे, दत्ता घाडगे, गोपाळ चौधरी, राज्य संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष, विभागीय संघटन सचिव, राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार असून स्वतंत्र विक्रेता मंडळाची अंमलबजावणी, पेन्शन योजना, आरोग्य व शिक्षण सुविधा, विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी, पेपर स्टॉलसाठी जागा उपलब्धता, शासकीय योजनांचा लाभ, वैद्यकीय सुविधा, विक्रेता भवन उभारणी तसेच रेल्वे व एस.टी. प्रवास सवलती आदी मुद्द्यांवर ठराव मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या अधिवेशनाचे आयोजन श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त वृतपत्र विक्रेता बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाळेकरमकर, उपाध्यक्ष राजेन्द्र गव्हारे, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सचिन आकरे मारोती बाळेकरमकर, संदिप आकरे, देवेंद्र बारापात्रे, पुरुषोत्तम रोळे, उमेश सोनटक्के, विक्रम गव्हारे, आकाश वैरागडे, आदी सदस्यांनी केले आहे.
