१३ फेब्रुवारी ला जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविणार
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,९ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील २ लाख २४ हजार १०३ मुले असून या वयोगटातील मुलांना परजीवी जंतापासून आजार उद्भवण्याचा धोका आहे. सोबतच दुषित मातीच्या संपर्कात आल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे. परिणामी कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भूक मंदावणे, अतिसार, आतड्यावर सूज येणे आदी समस्या निर्माण होतात. यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम १३ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.पत्रकारपरिषदे ला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके उपस्थित होते.
१३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात २ लाख २४ हजार १०३ लाभार्थी बालके आहेत. यामध्ये १ ते ६ वर्षे वयोगटात ६५ हजार ३८१, ६ ते १० वर्षे वयोगटात ५४ हजार ९८२ तर १० ते १९ वर्षे वयोगटात १ लाख ३ हजार ७४० जणांचा समावेश आहे. या बालकांसाठी ६ लाख गोळ्या प्राप्त झाल्या आहेत.
या मोहिमेसाठी ४ हजार ६६० नोडल शिक्षक, आशा व अंगणवाडीसेविका असून यामध्ये अंगणवाडी व मीनी अंगणवाडीसेविका १ हजार ७५०, नोडल शिक्षक १ हजार ६८१ व आशा १ हजार २२९ जणांचा समावेश आहे. फेब्रुवारी व ऑगस्टमध्ये दर सहा महिन्यांनी ही मोहीम राबविण्यात येते. तसेच २० फेब्रुवारी रोजी मॉपअपदिन आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दावल साळवे यांनी दिली.
