कोंबडा कापला म्हणून निर्दयी बापाने केली मुलाची हत्या
जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी आरोपी वडीलाला जन्मठेपेची सुनावली शिक्षा

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,११ ऑगस्ट)
संपादक:संदिप कांबळे
कोंबडा कापल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून राग अनावर झालेल्या निर्दयी बापाने कुऱ्हाडीचे सपासप घाव घालत आपल्या तरुण मुलाचा खून करण्याची घटना रा.येंकाबंडा ता. अहेरी जि. गडचिरोली गावात घडली होती.
रामा गंगा कोडापे असे आरोपी वडीलाचे तर शंकर रामा कोडापे असे मृत मुलाचे नाव आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. रामाचा मुलगा शंकर, पत्नी राधा आणि त्यांची छोटी मुलगी असे हे कुटुंब येंकाबंडा येथे राहात होते. घटनेच्या दिवशी दुपारी ०१:३० वाजताच्या सुमारास शंकर याने वडील रामाला माझा कोंबडा का कापलास, असे विचारले. यावरून दोघा बाप-लेकात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रामा याने मुलगा शंकर याला घरातील बाजेवर ढकलले आणि घरातून कुऱ्हाड आणून शंकरवर निर्दयीपणे वार केले.त्यात शंकर चा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सासरा घरून निघून जाताच शंकरची पत्नी राधा हिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथेच मरण पावला होता. जिमलगट्टा पोलिसांनी तक्रारीवरून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास करत सर्व पुरावे गोळा केले. न्या. शुक्ल यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयाण ग्राह्य धरून आरोपी रामा कोडापे याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास ६ महिने कारावास अश्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.
