राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हास्तरीय प्रबोधन शिबिर संपन्न
एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे एक दिवशीय राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हास्तरीय प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे अध्यक्ष विलास सोमनकर तेली समाज संघटन एटापल्ली हे होते. प्रमुख मार्गदर्शक धनराज गेडाम जिल्हाध्यक्ष चंद्रपूर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ,भोजराज कानेकर गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रोटान तसेच प्रमोद राऊत गडचिरोली तालुका सचिव प्रोटान हे होते.
प्रमुख मार्गदर्शक धनराज गेडाम आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, भारतातील मूलनिवासी बहुजन समाजाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी या ट्रेड युनियन ची स्थापना १९२६ ॲक्ट नुसार करण्यात आली आहे. देशात अनेक संघटना असून सुद्धा बहुजनांच्या समस्या अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याचा अर्थ अनेक ट्रेड युनियन असून सुद्धा ह्या सत्ताधारी पक्षांचे काम करतात परंतु बहुजन समाजाचे काम करताना दिसत नाही. त्यामुळे बहुजन समाज दुखी आणि दारिद्र्याचे जीवन जगत असल्याचे दिसून येते.
भोजराज कानेकर म्हणाले की या देशातील मूलनिवासी बहुजन समाजात अनेक समस्या आहेत . बहुजन समाज हा सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीत विभागला आहे आणि तो अजूनही एकत्र आलेला नाही. जर बहुजन समाज एकत्र आला तर त्यांच्या समस्या ह्या सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी बहुजन समाजातील जातीभेद सुद्धा नष्ट होणे आवश्यक आहे .जाती तोडो समाज जोडो हा अभियान राबवून सर्व जातींचा एकच बहुजन समाज निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .
प्रमोद राऊत म्हणाले की, ओबीसींची जातनिहाय जनगणना १९३१ नंतर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले आहे . आपल्या अधिकाराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून लढा देणे गरजेचे आहे.
या शिबिराचे नियोजन डॉक्टर प्रशांत खोब्रागडे यांनी केले. या शिबिराला नीलकंठ ढोडरे ,रोहित मडावी ,गौरी कन्नाके, धम्मदीक्षा वाघाडे ,राहुल ढबाले, सुभाष दूधबळे , बाबुल लाकडे, अनिल भसारकर , सचु कोरामी, जी .जी . वनकर ,आर. बी. चांदेकर, ओ. एम. मडावी, सुनिता चांदेकर, शालिनी नैताम ,सुखदेव चांदेकर व जिल्ह्यातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. या शिबिराचे संचालन प्राध्यापक प्रभाकर करमे यांनी केले तर आभार प्राध्यापक अजय दहगावकर यांनी मानले. शेवटी स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
