शंकर बडोले यांच्या कुटुंबीयांना कंत्राटदार संघटनेचा मदतीचा हात
‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून आर्थिक मदत; दुःखाच्या प्रसंगी जपली सामाजिक बांधिलकी

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ८ ऑक्टोबर २०२६)
घरबांधकाम कंत्राटदार संघटना, गडचिरोली यांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत अपघाती निधन झालेले बांधकाम क्षेत्रातील मिस्त्री शंकर बडोले यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहत संघटनेने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
शंकर बडोले यांचे नुकतेच रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बांधकाम क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली.
या परिस्थितीची जाणीव ठेवत घरबांधकाम कंत्राटदार संघटनेच्या सदस्यांनी स्वेच्छेने आर्थिक मदत जमा केली. बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बडोले यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि जमा करण्यात आलेली आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष केशव लाटीलवार, कोषाध्यक्ष दिवाकर मशाखेत्री, आशिष भरणे, मनोज बुधबावरे, सचिव बाळू मोहुर्ले तसेच विकास तरमनवार उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष केशव लाटीलवार म्हणाले, “संघटना ही केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच संघटनेची खरी ताकद आहे. आर्थिक मदतीपेक्षाही संकटात असलेल्या कुटुंबाला ‘आपण एकटे नाही’ हा विश्वास देणे अधिक महत्त्वाचे आहे. भविष्यातही कोणत्याही बांधकाम कामगारावर किंवा मिस्त्री बांधवावर संकट आल्यास संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.”
