५ नोव्हेंबरला नागपूर पदयात्रेत सहभागी होण्याचे डॉ. प्रणय खुणे यांचे जोरदार आवाहन!

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.३ नोव्हेंबर २०२६)
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालयात ‘राष्ट्रचिंतन संवाद – लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या प्रमुख नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात देशाची सद्य सामाजिक व राजकीय परिस्थिती, विरोधकांकडून पसरवली जाणारी अराजकता, दिशाभूल करणारा प्रचार आणि लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. यावेळी लोकशाही मूल्यांचे जतन करणे, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि जनतेपर्यंत खरी वस्तुस्थिती पोहोचविण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे, असा मोलाचा संदेश उपस्थित नेत्यांनी दिला.
नागपूर पदयात्रेचे जोरदार आवाहन
येत्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या महत्त्वपूर्ण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेसाठी गडचिरोली जिल्ह्यातूनही जय्यत तयारी सुरू असून, जिल्ह्यातील तमाम भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोच्या संख्येने या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन भाजपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले आहे.
