विदर्भाची काशी’ मार्कंडा देवसाठी गडचिरोलीवरून एसटी सुरू करा
वारकऱ्यांची आगार प्रमुखांसह लोकप्रतिनिधींकडे मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ४ नोव्हेंबर २०२६)
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्कंडा देव येथे दर्शन आणि पूजेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची खाजगी वाहनधारकांकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही लूट थांबवण्यासाठी आणि कोरोना काळापासून बंद असलेली गडचिरोली ते मार्कंडा देव एसटी बस सेवा (सकाळी व संध्याकाळी) तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक वृद्ध वारकरी व भाविकांनी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खाजगी वाहनांची मनमानी अन् भाविकांची लूट
!!
मार्कंडा देव येथे दर सोमवारी होणाऱ्या गंगेच्या महाआरतीसाठी आणि वर्षभर महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून हजारो भाविक, वृद्ध व वारकरी मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. सध्या चामोर्शीवरून फराडाकडे जाणारी विद्यार्थ्यांची बस सकाळी १०:३० वाजता धावते, परंतु गडचिरोलीवरून थेट मार्कंडा देवसाठी कोणतीही बस सोय उपलब्ध नाही.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत खाजगी वाहनधारक भाविकांची पिळवणूक करत आहेत. चामोर्शी ते मार्कंडा दरम्यान एका व्यक्तीला येण्या-जाण्यासाठी १०० रुपये (येण्याचे ५० व जाण्याचे ५० रुपये) मोजावे लागत आहेत. या वाढत्या आर्थिक भुर्दंडामुळे विशेषतः वृद्ध वारकरी व सर्वसामान्य भाविक त्रस्त झाले आहेत.
भाविकांची ही दैनंदिन लूट थांबवण्यासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ महाराजांनी पुढाकार घेतला आहे. श्री मार्कंडेश्वर देवस्थान (रजि. नं. PTRNA 587, चंद्रपूर) तसेच रामप्रसाद महाराज जयस्वाल मराठा धर्मशाळा मार्कंडा देव (रजि. नं. E 31, चामोर्शी) या दोन्ही देवस्थान संस्थांची अधिकृत शिफारस पत्रे जोडून एसटी आगार व्यवस्थापक, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
सकाळी आणि संध्याकाळी गडचिरोलीवरून थेट मार्कंडा देवसाठी दोन फेऱ्या सुरू केल्यास भाविकांची मोठी सोय होईल, असा विश्वास या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी वारकरी दिग्गजांची उपस्थिती
हे निवेदन सुपूर्द करताना वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती. यामध्ये अनुरथ नीलेकार,देवराव मोगरकर,केवतराम जेंगठे,सुरेश बंडावार, मृत्युंजय गायकवाड,
पुरुषोत्तम शेंडे,देवेंद्र ब्राह्मणवाडे,मोरेश्वर आवारी,वासुदेव तिवाडे या सर्वांनी प्रशासनाला तातडीने यावर सकारात्मक निर्णय घेऊन एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली आहे.
