खोट्या दस्तऐवजा च्या आधारे पोलीस दलात प्रवेश करु पाहणारे ५ जण अटकेत

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२३ एप्रिल)
गडचिरोली चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती २०२१ या भरतीप्रक्रियेची नोव्हेंबर २०२२ पासून सुरुवात झाली असून भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर गैरप्रकार अथवा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जावू नये याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आवाहन केले होते,पोलीस भरतीची कागदपत्रे तपासणी सुरु असतांना अचानक पोलीस अधीक्षक यांना निनावी पत्र प्राप्त झाले.
सदर पत्रात सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत तसेच मागील पोलीस भरतीत देखील काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्ताचा समांतर आरक्षण घेण्याकरीता गडचिरोली येथील एका इसमाच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून पोलीस भरतीकरीता आवेदन अर्ज केला व मागील भरतीत त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा लाभ घेवून नोकरी मिळविली आहे.
सदर अर्जाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांचे कक्षात स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांना बोलावून सदर अर्जाबाबत गोपनियरीत्या सखोल चौकशी करुन तात्काळ योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केले होते.
(आरोपींना जेरबंद करून नेतांना पोलीस कर्मचारी)
अधीक्षक गडचिरोली यांचे आदेश प्राप्त होताच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून चौकशी सुरु करण्यात आली. सदर चौकशी दरम्यान सुरु असलेल्या पोलीस भरतीत तात्पुरत्या निवड यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या ४ उमेदवारांचे प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले तसेच मागील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड होऊन पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेल्या ५ उमेदवारांपैकी २ उमेदवारांचे प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे दिसुन आले.
सर्व प्रमाणपत्राची चौकशी पथकाने बारकाईने पाहणी केली तेव्हा असे निदर्शनास आले की, एकाच स्थापर मालमत्तेसंदर्भात दोन वेगवेगळ्या इसमांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यातील एक नवप्रविष्ट पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेला होता तर त्यातील दुसऱ्याची सुरु असलेल्या पोलीस भरतीत तात्पुरत्या निवड करण्यात आली होती. यावरुन पोलीसांचा अधिकच संशय बळावल्याने त्यांनी बीड येथे जावुन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रात दर्शविलेल्या स्थावर मालमतेच्या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा मोठया प्रमाणात तफावत दिसून आली या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेले नवप्रविष्ठ पोलीस शिपाई व निवड झालेले उमेदवार यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे कुठलेही पुर्वज बीड जिल्ह्यातील रहिवासी नसतांना किंवा त्यांची तेथील कुठलीही स्थावर मालमत्ता शासनाने प्रकल्पाकरीता संपादित केली नसतांना देखील खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्यात आले असल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली कडुन केलेल्या चौकशी दरम्यान सदर प्रमाणपत्रे बोगस असल्याची खात्री होताच पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप.क्र. २९१/२०२३ फलम ४१९, ४२०, ४६७, ४६८,४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघुन तपास पोलीस निरीक्षक उल्हास
भुसारी, स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक बी. उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक बी. दिपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम वाडगुरे,नरेश सहारे, हेमंत गेडाम, सतिश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, शुक्रवारी गवई,माणिक दुधबळे, सुनिल पट्टावार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश बट्टी, प्रशांत गरफडे, पंकज भगत, लीला सिडाम,शेवंता दाजगायें,पुष्पा कनाके, सोनम जामुळकर, शगीर शेख, मनोहर टोगरवार यांनी केलेली आहे.
