शासकीय जागेवर अनधिकृत डांबर प्लांट उभारणी?
संतोष ताटीकोंडावार यांची उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार

लोकशाही न्युज,अहेरी(दि,२५ नोव्हेंबर)
सिरोंचा-असरअल्ली रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यासाठी नागपूर येथील कंट्रक्शन कंपनीने सिरोंचा येथील सरकारी जमिनीवर अनाधिकृतपणे डांबर प्लांटची उभारणी करीत शेकडो ब्रास गिट्टीची साठवणूक केली आहे. त्यामुळे या गैरप्रकाराची सखोल चौकशी करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक करणा-या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करुन कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम करतांना संबंधित कंत्राटदाराचे डांबर प्लांट कामाच्या जवळपास अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनीने सिरोंचा माल येथील ४१३ व ४१४ या जमिनीवर पडीत व निकामी अवस्थेत असलेल्या बीआरओ कंपनीच्या बॅच मिक्स प्लांटच्या शेतजारी अनाधिकृत डॉंबर प्लांट उभारले आहे. सार्वजनीक बांधकाम विभाग सिरोंचा यांच्या संगनमताने यात मोठ्या भ्रष्टाचाराला वाव असल्याचा आरोपही ताटीकोंडावार यांनी केला आहे. तसेच संबंधित कंपनीद्वारे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार रस्त्याचे काम होत अनसून निकृष्ट दर्जाचे तसेच अर्धवट काम केल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सदर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीतर्फे करण्यात आलेल्या कामासह अनाधिकृत जमिनीवर उभारलेल्या डांबर प्लांटची सविस्तर चौकशी करुन संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी.
अन्यथा ४ डिसेंबरपासून सिरोंचा तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी अहेरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
