
लोकशाही न्युज,चामोर्शी (दि. १८ मे)
चामोर्शी शहरातून जाणाऱ्या आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १८ मे) एक भीषण अपघात झाला. इकोस्पोर्ट वाहन क्रमांक एमएच ३३ व्ही ८०२५ अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक सी जी ०४ एल डब्लू ०२८४ ने कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारमधील ४ जण जागीच ठार झाले.
विनोद पुंजाराम काटवे (वय ४५), राजू सदाशिव नैताम (वय ४५) आणि सुनील वैरागडे (वय ५५), सर्व रा. गडचिरोली,तर अनिल मारोती सातपुते (वय ५०), रा. चामोर्शी, यांचा मृतात समावेश आहे.
मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करिता चामोर्शी रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.
चौघेही जण आज कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर चालकाने अचानक यू टर्न घेतला. याच वेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस करत आहेत.
