गडचिरोली : गोकुळनगर वार्ड क्र. २३ मध्ये विकास कामांना गती
नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या पाठपुराव्याला यश

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ जून)
गडचिरोली शहरातील गोकुळनगर वार्ड क्र. २३ मधील नागरिकांची तब्बल २० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास आली असून, सुंदरा करकडे यांच्या घरापासून बेबीनंदा डोंगरे यांच्या घरामार्गे पुल्लेवार यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दशकांपासून या भागातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून ये-जा करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी करूनही हा प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
मात्र नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. रस्त्याच्या कामासाठी त्यांनी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून रस्त्याचे काम पूर्ण केले.
