विजेचा धक्का लागून १३ वर्षीय मुलगी जखमी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२ नोव्हेंबर)
शहरातील लांझेडा परिसरातील एका लेआऊटवर खेळत असताना विजेचा धक्का लागल्याने १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. मृण्मयी श्रीकांत पालेकर (वय १३, रा. कोल्हापूर) असे जखमी मुलीचे नाव असून धन्वंतरी हॉस्पिटल गडचिरोली येथे भरती करण्यात आले पण रुग्ण गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथील हलविण्यात आले आहे.
मृण्मयी ही आपल्या मामा रुपेश वलके यांच्याकडे दिवाळीच्या सुट्टीत गडचिरोलीला आली होती. दुपारच्या सुमारास ती घरासमोरील लेआऊट मध्ये सवंगड्यांसोबत खेळत असताना हा अपघात घडला. लेआऊटमधील एका ठिकाणी उभारलेल्या झेंड्याचा स्पर्श ११ केव्ही विजेच्या तारांना झाल्याने मोठा स्पार्किंग होऊन भडका उडाला. यात मृण्मयीच्या हात-पायाला गंभीर दुखापत झाली.
लांड़ोडा वॉर्डातून ११ केव्हीची लाइन गेली असतानाही त्यांनी त्या ठिकाणी लेआऊट तयार केले आहेत.घटनेनंतर नागरिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, लेआऊटमधूनच ११ केव्ही लाइनचा पुरवठा जात असून, अशा ठिकाणी निवासी प्रकल्प उभारण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित लेआऊट मालकाने विजेच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
