गडचिरोली : नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांचे अपघाती निधन
लोकशाही न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.२८ फेब्रुवारी)
शहरातील कारगिल चौक परिसरात (दि.२७ फेब्रुवारी)रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात गडचिरोलीचे नगरसेवक व सभापती मुक्तेश्वर काटवे वय. ५५ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे हे डॉ. देवराव होळी यांच्या इंदिरा गांधी चौक येथील स्वागत समारंभानंतर दुचाकीने आपल्या घरी परतत होते. कारगिल चौक परिसरात अचानक एक डुक्कर त्यांच्या गाडीसमोर आल्याने त्यांनी वाहनावरील ताबा गमावला आणि दुचाकी घसरून ते जोरात रस्त्यावर आपटले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत काटवे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे व अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दुसऱ्यांदा बनले होते नगरसेवक
प्रभाग क्र. ९ मधून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. व यावर्षी नगर परिषदेमध्ये त्यांना आरोग्य व स्वच्छता सभापती बनवण्यात आले होते. शहराची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे होती. भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सुद्धा होते.
