
लोकशाही न्युज,आरमोरी (दि,६ ऑगष्ट)
शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शहरांतील गरीब, गरजू लाभार्थ्यांना मंजूर घरकुल बांधकामाचा तिसरा हप्ता गेल्या वर्षभरापासून मिळाला नसल्याने गरीब लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून लाभार्थ्यांच्या घरकुलाचे अंतिम टप्प्यात आलेले बांधकाम ठप्प पडले आहे. त्यामुळे घरकुल बांधकामाचा अनुदानाचा शेवटचा हप्ता तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक.५ ऑगस्ट पासुन आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके हे घरकूल लाभार्थ्यांसह नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
आरमोरी शहरातील अनेक गरीब लाभार्थ्यांना शासकीय स्तरावरुन २०२२-२३ मध्ये घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले. शासकीय स्तरावरुन घरकुलाचे काही हप्ते देण्यात आले.मात्र मागील १ वर्षांपासून शेवटच्या अनुदानाचे ३० हजार रुपये लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने उर्वरीत बांधकाम रखडले आहे.घरकुल लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळण्यासाठी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी पाठपुरावा करून निवेदनाद्वारा मागणी केली असता नगरपरिषदेने केंद्र शासनाचा तिसरा व अंतिम ३० हजार रुपये प्रमाणे शेवटचा हप्ता मिळाला नसल्याचे पत्राद्वारे कळवले होते.
घरकुलाचा ३० हजार रुपये शेवटचा हप्ता देण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नसल्याने आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांचे नेतृत्वात घरकुल लाभार्थ्यांनी सोमवार ५ ऑगष्ट पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.उपोषणाला छगन शेडमाके यांच्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष शालिकराम पत्रे, लाभार्थी वासुदेव दूमाने, बाजीराव पारधी, ज्ञानदेव वादिकर, नारायण सपाटे, दिपक शेरकुरे, शालिकराम शेरकूरे, प्रतिभा बुल्ले, हिराबाई शेंद्रे, राजु धारणे, शाकीर शेख, लता कोल्हे, केवळराम शेंडे, घनशाम दूमाने, अहिल्या अहेरकर, हेमंत पोटेकर, मोहन दिवटे, वामन पारधी सह शंभराच्या वर घरकूल लाभार्थी आहेत.
