जाहिरात
आरोग्य

रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

जिल्ह्यातील ८२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ जून)

२,३०८ लसीकरण केंद्रे, १२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज

० ते ५ वर्षांतील प्रत्येक बालकाला पोलिओ डोस देण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील ८२ हजार ९८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११ लाख ४१ हजार १६५ असून, प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात २,३०८ पोलिओ लसीकरण केंद्रे (बूथ) उभारण्यात आली आहेत.

प्रवासादरम्यान किंवा दुर्गम भागातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी १२३ ट्रान्झिट पथके बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके व इतर गर्दीच्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. तसेच दुर्गम पाडे, वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ९८ मोबाईल (फिरती) पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामपंचायत स्तरावरील लसीकरण केंद्रे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला रविवारी, दि. २८ जून रोजी जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस अवश्य देण्याचे आवाहन केले आहे.

अविश्यात पंडा,जिल्हाधिकारी गडचिरोली “लसीकरण हे बालकांच्या आरोग्याचे प्रभावी संरक्षण आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून कायमस्वरूपी बचाव करण्यासाठी प्रत्येक पात्र बालकाला पोलिओ डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. या लोकहिताच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”

सुहास गाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली

पोलिओमुक्त भारत हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे. या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”

 डॉ. प्रताप  शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी

“दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका आपल्या सेवेत तत्पर राहतील. पालकांनी कोणतीही शंका न बाळगता आपल्या बालकाला पोलिओचा डोस द्यावा.”

आरोग्य विभागाने सर्व पालकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी आपल्या परिसरातील जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओमुक्त समाज घडविण्याच्या राष्ट्रीय अभियानात आपला सहभाग नोंदवावा.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button