जाहिरात
ताज्या घडामोडी

मामाच्या गावात बच्चे कंपनीने केली धमाल निसर्गज्ञानासोबत पारंपरिक खेळ

ग्रिन्स संस्थेचे सहावे शिबिर उत्साहात

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१९ मे)

आजच्या मोबाईल रिल्सच्या युगात बच्चेकंपनीचं हक्काचं मामाचं गाव हरवलं आहे. ही कमतरता काही प्रमाणात दूर करण्यासह बालकांवर निसर्ग संस्कार करण्यासाठी ग्रिन्स संस्थेच्या वतीने मागील सहा वर्षांपासून मामाच्या गावाला जाऊया हे अनोखे शिबिर नियमित आयोजित करण्यात येत आहे. यंदाही आयोजित सहाव्या शिबिरात बच्चेकंपनीने मामाच्या गावात धमाल करतानाच निसर्गज्ञान प्राप्त करत पारंपरिक खेळांचाही आनंद घेतला.

हेमंत जंबेवार यांच्या चांदाळा येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आश्रमशाळेत आयोजित या तीनदिवसीय शिबिरात ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी पहिल्या सत्रात बच्चे कंपनीशी संवाद साधत मानवी उत्क्रांतीवादापासून भौगोलिक, खगोलीय घटना, कोट्यवधी वर्षांपूर्वीचे अंतरीक्ष, पृथ्वीची स्थिती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर, गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनात बालकांनी पक्षिनिरीक्षण करत ३५ हून अधिक पक्ष्यांची नोंद केली.

ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष तथा योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात स्टोन पेंटींग करत विविध कलाकृती साकारल्या. संजय शेगावकर, प्राचार्य सुधीर गोहणे यांच्या मार्गदर्शनात पळस पानांच्या पत्रवळी व द्रोण तयार केले. तसेच नागपूरहून आलेले मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनात विविध पारंपरिक व इतर खेळांचा आनंद घेतला. दरम्यान पोलो या खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रख्यात खेळाडू तथा लाॅयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेडचे हिंमतसिंह बेदला यांनी शिबिराला भेट देत बच्चे कंपनीशी मनमोकळा संवाद साधताना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच त्यांच्याकडील घोडे, घोड्यांवर बसून खेळण्यात येणारा पोलो हा खेळ आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. बच्चेकंपनीच्या भेटीला नियमित नागपूरहून येणारे खगोल अभ्यासक ऋतुराज मावळणकर, कपील पांडव यांनी खगोलीय ज्ञान देतानाच टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शन घडवले. बालकांनी शुक्र, गुरू, शनीसारख्या ग्रहांसह वृश्चिक, कन्या, तुला अशा आकाशातील राशी व नक्षत्रांचे निरीक्षण करत माहिती जाणून घेतली.

अबुझमाड शिक्षण संस्थेचे शमशेरखान पठाण यांनी शिबिरातील बालकांना आंबे, केळ्यांचा खाऊ आणला. बालकांशी संवाद साधत शिक्षणविषयक मार्गदर्शन केले. सर्व मुलांनी शिबिरातच आपल्या पालकांना पत्र लिहिले असून ही पत्रे पोस्टाद्वारे पालकांना मिळणार आहेत. शेवटच्या समारोपीय सत्रात हेमंत जंबेवार यांनी सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत शिबिरातून मिळालेले संस्कार कायम जपण्याचे आवाहन केले. अंजली कुळमेथे, मिलिंद उमरे यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरासाठी ग्रिन्स संस्थेचे प्राचार्य सुधीर गोहणे, सेवानिवृत्त प्राचार्य शेमदेव चाफले, हेमंत जंबेवार, शमशेरखान पठाण, राजेश इटनकर, मीरा बिसेन-चौधरी, प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, सुरेश लडके, सुभाष धंदरे, मनोज सुतार, डाॅ. लोकेश तामगीरे, डाॅ. विनोद बिटपल्लीवार, नितीन हेमके, किशोर पाचभाई, सतीश चिचघरे, खुशाल ठाकरे आदींनी सहकार्य केले. शेवटच्या दिवशी साग्रसंगीत जेवणासह बच्चेकंपनीने एकत्र येऊन स्वत: तयार केलेल्या आमरसाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी होणारे अशा प्रकारचे हे एकमेव शिबिर आहे.

उलगडले अश्वांचे अद्भूत विश्व.
!!
यंदाच्या शिबिरात इतर सत्रांसोबतच आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडून हिंमतसिंह बेदला यांचे सत्र अविस्मरणीय ठरले. मुळचे उदयपुरचे असलेले बेदला यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना अवघ्या दोन वर्षाचे असताना भावासोबत पहिल्यांदा घोड्यावर बसल्याचे सांगितले. वयाच्या चौथ्या वर्षी अश्वारोहण शिकल्यानंतर शाळेतसुद्धा घोड्यावरच जात होतो, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय घोड्यांचा इतिहास, विविध प्रजाती, भारतातच निर्माण झालेला आणि पुढे युरोपात लोकप्रिय झालेला पोलो खेळ, पोलोच्या विविध स्पर्धा, त्यातील जय-पराजय, पोलोसाठी निवडण्यात येणारे अश्व, त्यांचे संगोपन, अर्जेंटिनासारख्या देशातून ते आयात करत असलेल्या अश्वांची वैशिष्ट्ये, इतिहासात अजरामर झालेल्या महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा आणि त्याचा मोठा भाऊ नाटक नावाच्या घोड्याची करुण कथा अशी अद्भूतरम्य माहिती देताना हिंमतसिंह बेदला यांनी बच्चेकंपनीपुढे अश्वांचे विश्व अलगदपणे उलगडले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button