जाहिरात
ताज्या घडामोडी

दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात

समाजसेवक उदय धकाते यांच्या पुढाकाराने स्थानिक संपर्कातून धीर व सहकार्य

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ५ मार्च )

आखाती देशांतील तणावामुळे दुबईत अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबाला अखेर स्थानिक पातळीवर मदतीचा दिलासा मिळाला आहे. समाजसेवक उदय धकाते यांच्या पुढाकाराने दुबईतील भारतीय नागरिक विलास चांदेकर यांनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

शहरातील मुख्य चौकातील ‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार हे कुटुंबासह पर्यटनासाठी दुबईला गेले होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने ते तेथेच अडकले. मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची विनंती केली होती. ही माहिती समाजमाध्यमांद्वारे गडचिरोलीत पसरताच उदय धकाते यांनी तात्काळ हालचाल केली.

धकाते यांनी मागील वीस वर्षांपासून दुबईत वास्तव्यास असलेले विलास चांदेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. चांदेकर यांनी प्रयत्नपूर्वक बुरेवार कुटुंबाशी संपर्क साधला. अखेर रात्री उशिरा नील बुरेवार यांच्याशी संपर्क होऊन कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.

उदय धकाते यांच्या विनंतीनुसार विलास चांदेकर यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन सुनील बुरेवार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी त्यांना मानसिक आधार देत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सध्या युद्धसदृश परिस्थितीमुळे विमानसेवा विस्कळीत असली तरी पाच मार्च रोजी शक्यतो परतीचा प्रयत्न करता येईल, अशी माहिती सुनील बुरेवार यांनी दूरध्वनीद्वारे उदय धकाते यांना दिली.

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीतील सर्वात जुनी जिल्हा परिषद शासकीय हायस्कूलच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन उदय धकाते यांनी माजी शाळानायक म्हणून केले होते. त्या कार्यक्रमात देश-विदेशातून सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच ओळखीतून विलास चांदेकर यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला होता. विशेष म्हणजे बुरेवार आणि चांदेकर हे दोघेही त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असून, दुबईतील या भेटीत ते एकाच गावातील व शेजारी असल्याचेही उघड झाले.

दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला वेळेवर मदतीचा हात मिळाल्याने त्यांच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारांनी समाधान व्यक्त केले असून, उदय धकाते आणि विलास चांदेकर यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button