बहुचर्चित अगरबत्ती प्रकल्पाची सीबीआय, ईडी, एसआयटी चौकशी करा, नगरसेवक आशिष पिपरे
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२३ फेब्रुवारी)
“मेक इन गडचिरोली” अंतर्गत राबविण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पावरून सुरू असलेल्या आरोपांच्या मालिकेला आता एक नवीन वळण मिळाले आहे. चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, या प्रकरणाची CBI, ED किंवा SIT मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी स्वतःहून प्रशासनाकडे केली आहे. (दि. २३ फेब्रुवारी) रोजी चंद्रपूर महामार्गावरील हॉटेल लँडमार्क येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चामोर्शीचे नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी केली आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधकांनी रचलेला हा एक ‘सुनियोजित कट’ असल्याचा दावा त्यांनी याप्रसंगी केला आहे.
नगरसेवक पिपरे यांनी स्पष्ट केले की, माजी आमदारांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा उद्योग केंद्र, बँक ऑफ महाराष्ट्र व इतर बँकांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. मशीन खरेदीचा खुलासा: सुरुवातीला मशीनचे कोटेशन १,१८,००० रुपये देण्यात आले होते. मात्र, आपण स्वतः पुढाकार घेऊन इंडियामार्ट व ऑनलाइन दर तपासले असता मशीन ९०,००० रुपयांत उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलांच्या हितासाठी ९०,००० रुपयांतच मशीन खरेदी करण्यात आल्या. करार आणि उत्पादन: गेल्या तीन वर्षांत या मशीनमधून ४-५ टन माल उत्पादन झाला असून मशीन अजूनही सुस्थितीत आहेत. याबद्दल महिलांनी स्वतः १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून दिले आहे, असेही पिपरे यांनी नमूद केले.
आपल्याविरोधात तक्रार करणाऱ्या कविता किरमे आणि चंद्रशेखर म्हस्के यांच्यावर पिपरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “हे दोघे स्वतःच ‘बंटी-बब्ली’ असून त्यांनी रोझवॅली आणि चिटफंडच्या माध्यमातून गरिबांची करोडोंनी फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात अनेक पोलीस तक्रारी आहेत. निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी ते आता निराधार महिलांची दिशाभूल करून मला बदनाम करत आहेत,” असे पिपरे म्हणाले.
आशिष पिपरे यांनी या आंदोलनामागचे राजकीय कारणही स्पष्ट केले आहे. नगरपंचायत निवडणूक: आगामी चामोर्शी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पिपरे प्रबळ उमेदवार आहेत. ६० ते ७० टक्के मतदार असलेल्या तेली समाजाचे ते नेतृत्व (महाराष्ट्र तैलिक महासभा अध्यक्ष) करत असल्याने त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घोटाळ्यांचे उघडकीकरण: पिपरे यांनी नुकतेच बाजार समिती आणि खरेदी विक्री संघातील मोठे घोटाळे बाहेर काढले आहेत. यात तालुक्यातील एका ‘स्वयंघोषित सहकार महर्षी’वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या मोठ्या नेत्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांना पुढे करून हे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप पिपरे यांनी केला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध आशिष पिपरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तींना वकीलामार्फत नोटीस पाठवली आहे. लवकरच न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
“मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. उलट मीच मागणी करतो की, या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. राजकीय विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल. संपूर्ण समाज आणि जनता माझ्या पाठीशी आहे.” असेही आशिष पिपरे यांनी म्हटले आहे.
