लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.६ नोव्हेंबर)
नगरपरिषद गडचिरोली निवडणूक लढवण्यासाठी गडचिरोली शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष व विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन गडचिरोली परिवर्तन पॅनल ची स्थापना केली. यामध्ये बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आजाद समाज पार्टी व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी या प्रमुख पक्षासह काही पुरोगामी संघटनाचा सहभाग आहे. या पॅनलच्या वतीने नगरपरिषदेच्या सर्व २७ नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती आज (दि.६ नोव्हेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहिदास राऊत यांनी दिली आहे.
गडचिरोली नगरपालिकेतील २७ उमेदवारांची यादी लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी गडचिरोली शहरातील सामाजिक चळवळीतील अग्रस्थानी असलेले नाव तसेच दोनदा नगरपरिषद निवडून लढविणाऱ्या वनिता बांबोळे यांचे नाव पॅनलच्या कोर कमिटी मध्ये निश्चित करण्यात आलेले आहे.
प्रस्थापितांच्या विरोधात परिवर्तन पॅनलची ही लढाई निवडणुकीत रंग भरणार आहे. गडचिरोली शहराचा विकास परिपूर्ण ध्यास असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गडचिरोली शहरात नव्याने स्थापन झालेले परिवर्तन पॅनल पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजांना घेऊन निवडणुकीला सामोर जाणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला रोहिदास राऊत केंद्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष तथा आघाडी निमंत्रक, वनिता बांबोळे नगराध्यक्ष उमेदवार परिवर्तन पॅनल, धर्मानंद मेश्राम, राज बनसोड जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे,विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे वंचित बहुजन आघाडी, जीके बारशिंगे, कोर सदस्य गौतम मेश्राम, भास्कर मेश्राम, हंसराज उंदीरवाडे, मिलिंद बांबोळे बी आर एस पी जिल्हा अध्यक्ष यांचे सह अनेक परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
