गडचिरोलीतील सर्पमित्रांचा विदर्भ वीर पुरस्काराने गौरव

लोकशाही न्युज,नागपूर (दि. ५ जानेवारी)
गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंश प्रतिबंध, साप बचाव कार्य व जनजागृतीच्या माध्यमातून मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्पमित्रांचा वाइल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, नागपूर यांच्या वतीने “विदर्भ वीर पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. हा गौरव सोहळा नुकताच नागपूर येथे पार पडला.
या पुरस्कारासाठी अजय कुकडकर, सौरभ सातपुते, योगेश हजारे, अनुप म्हशाखेत्री, चेतन थोराक, शिवम जुवारे व करण मंगर या सर्पमित्रांची निवड करण्यात आली. हे सर्व सर्पमित्र गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात घरांमध्ये, शेतशिवारात, शाळा, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करत आहेत.
वनविभागासोबत समन्वय साधत हे सर्पमित्र सर्पदंशाच्या घटनांमध्ये तातडीने मदत, नागरिकांमध्ये भीती न पसरवता योग्य मार्गदर्शन, तसेच सापांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती शिबिरे घेत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक मानवी जीव व सर्पांचे प्राण वाचले आहेत.
वाइल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, नागपूरच्या वतीने अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना सर्पमित्रांनी सांगितले की, “साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून त्यांचे संरक्षण होणे तितकेच आवश्यक आहे. नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास वन्यजीव प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यांतील सर्पमित्र व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
