९ ते ११ जानेवारी ला अभाविप चे ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन गडचिरोलीत
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ७ जानेवारी)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे ५४ वे प्रांत अधिवेशन दिनांक ०९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी भगवान बिरसा मुंडा नगर, सुमानंद सभागृह, आरमारी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री मा.श्री.अशोक उईके यांच्या हस्ते होणार असून, मुख्य अतिथी म्हणून नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक IPS संदीप पाटील तर अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. विरेंद्रसिंह सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर उद्घाटन दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजता होणार आहे. गडचिरोलीच्या पावन भूमीवर पहिल्यांदाच विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत आहे आणि हे अधिवेशन गडचिरोलीच्या इतिहासात ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहे.
हे प्रांत अधिवेशन विदर्भ प्रांताचे युवा तरुणाईला नवी ऊर्जा व दिशा देणारे ठरेल. या अधिवेशनात विदर्भाच्या १२० तालुके व ११९ मोठे सेंटर असे एकूण २३९ स्थानांवरून ३५० महाविद्यालयातून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभाग घेणार आहे. यावर्षी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती वर्षानिमित्त असल्यामुळे या संपूर्ण अधिवेशन परिसराला जनजाति वीर म्हणजेच ‘भगवान बिरसा मुंडा’ यांच्या नाव अधिवेशन स्थळी उभारण्यात आलेल्या नगराला देण्यात आले आहे तर या अधिवेशनाच्या मुख्य सभागृहाला वीर बाबुराव शेडमाके असे नाव देण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी ०६:३० वाजता प्रदर्शनी उद्घाटन समारंभ होणार आहे या प्रदर्शनीला स्व.गीताताई हिंगे यांचे नाव देण्यात आले आहे. जनजाति वीरांची यशोगाथा व अभाविपच्या कार्याचा परिचय देणारी प्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता सौ.शितलताई सोमनानी यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्य अतिथी म्हणून गडचिरोली विधान सभेचे माजी आमदार डॉ. देवराव होळी, गडचिरोली नगर परिषद अध्यक्ष ॲड.सौ.प्रणोती निंबोरकर आणि गडचिरोली येथील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष मा.श्री सुशील हिंगे उपस्थित राहणार आहे.
या ५४ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनामध्ये सन २०२५ -२०२६ साठी पुनर्निर्वाचीत प्रदेश अध्यक्ष डॉ. श्रीकांत पर्बत व नवनिर्वाचित प्रदेश मंत्री देवाशिष गोतरकर यांचे निर्वाचन या अधिवेशनात करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती व गडचिरोलीच्या विकासाच्या नवा दृष्टिकोन या विषयांवर प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. तर जनजाती संस्कृती व परंपरा, अभाविप कार्यपद्धती व कार्यविस्तार या दोन विषयावर भाषण सत्रे, शैक्षणिक परिसंवाद, पंचपरिवर्तन आदी विषयाला घेऊन एकूण १० सत्रे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशन परिसरात कमीत कमी प्लास्टिकच्या वापर कसा होईल असे प्रयत्न सर्व व्यवस्थेतील कार्यकर्ता करीत आहे. या संपूर्ण अधिवेशनात Zero Food Waste ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
अधिवेशन दरम्यान दिनांक १० जानेवारी २०२६ शनिवार रोजी दुपारी ०३:३० वाजता गडचिरोली शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार. ही यात्रा भगवान बिरसा मुंडा नगर सुमानंद सभागृह येथून इंदिरा गांधी चौक मार्गे, धानोरा रोड मार्ग तिथून बाबुराव मडावी चौक नंतर रेड्डी गोडाऊन चौक मार्गे तिथून चामोर्शी बस स्टॉप या मार्गाने जाणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता अभिनव लॉन येथे जाहीर सभेने शोभायात्रेचे समारोप होणार.
अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री श्री.विरेंद्र सोलंकी व राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके आणि छात्र नेते या सभेला संबोधित करणार. होणाऱ्या शोभायात्रेसाठी गडचिरोलीतील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अभाविप विदर्भ प्रांत मंत्री कु.पायल किनाके व गडचिरोली नगर मंत्री श्री संकेत म्हस्के यांनी केले. चार दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी विदर्भातून येणाऱ्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे उत्साह पूर्वक स्वागत करावे.
दि. ७ जानेवारी ला प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अभाविप विदर्भ प्रांत मंत्री कु.पायल किनाके,अभाविप गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा.सुनिता साळवे, गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के, गडचिरोली जिल्हा मीडिया संयोजक करण चौधरी उपस्थित होते.
