बोगस मजुर दाखवून लाखोंचा अपहार करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला निलंबित करा
डॉ. प्रणय खुणे यांची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३० ऑक्टोंबर)
आलापल्ली वनविभागातील आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांच्या नावावरून व खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित वनअधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आज (दि.३० ऑक्टोंबर) रोजी प्रेस क्लब, धानोरा रोड येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. खुणे म्हणाले की, “वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासन निधीचा अपहार करण्यात आला आहे. चौकशी अधिकार्यांनीही बोगस चौकशी करून संबंधितांना पाठीशी घातले असा गंभीर आरोप त्यांनी केला.या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठित करून फौजदारी गुन्हा नोंदवावा, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपयोजना, राज्य योजना, कॅम्पा योजना व संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केली.
चौकशी पारदर्शकपणे व्हावी,, तक्रारकर्त्यांची मागणी
!!!
तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केले की, चौकशी तक्रारकर्त्यांच्या उपस्थितीत व व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पारदर्शकपणे करावी. सर्व बोगस मजुरांच्या बँक खात्यांची पडताळणी, RTGS व्यवहारांची छाननी व व्हाऊचरची प्रत्यक्ष तुलना केल्यास भ्रष्टाचार उघडकीस येईल.
पत्रकार परिषदेला कृष्णा वाघाडे, रविंद्र सेलोटे, योगेश सिडाम, दिलीप येंगटीवर, विजय मज्जी व प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
