एटापल्ली : सुरजागड येथे कुर्मा घराचा यशस्वी उद्घाटन सोहळा संपन्न

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि. २ एप्रिल)
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये कुर्मा घर ही पारंपरिक प्रथा आजही प्रचलित आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी स्वतंत्र निवासस्थान म्हणून कुर्मा घराचा वापर केला जातो. ही एक स्वतंत्र संरचना असते जिथे महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गादी, आवश्यक साहित्य व सोयी-सुविधा दिल्या जातात. जरी मासिक पाळीबाबत जनजागृती वाढत असली तरीही, दुर्गम भागांमध्ये ही प्रथा आजही कायम आहे.
स्थानिक महिलांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन व लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती कीर्ती कृष्णायांच्या नेतृत्वाखाली सुरजागड (ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) येथे सुसज्ज कुर्माघर बांधण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परंपरेचा सन्मान राखत महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळणार आहेत.
उद्घाटनाच्या सोहळ्यासोबत मासिक पाळी स्वच्छता जनजागृती सत्र देखील आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला ३२ महिलांची उपस्थिती होती, तसेच गावातील मान्यवरांनीही या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच आणि आशा वर्कर कल्पना आलाम, ग्रामपंचायत पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सङमेक कुर्मा घराच्या अध्यक्षा निर्मला सडमेक, सुरजागड भूमिया लालसाय तलांडे, तसेच एलकेएएम हॉस्पिटल आणि एलआरव्हीएन स्कूलच्या प्रकल्प संचालिका सुनीता मेहता यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य मासिक पाळी स्वच्छता आणि जनजागृती महत्त्वाची आहे. एलकेएएम हॉस्पिटलच्या कविता दुर्गम यांनी महिलांना मासिक पाळी स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले.
सरपंच अरुणा सडमेक यांनी या महत्त्वाच्या विषयावर आपले विचार मांडले आणि या उपक्रमासाठी आपला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कुर्माघराच्या अधिकृत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, ज्यामध्ये सरपंच व महिलांनी स्वाक्षरी करून कुर्मा घराचे व्यवस्थापन आणि संचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
यावेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स देखील वाटप करण्यात आले, जेणेकरून मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल आणि योग्य सुविधा उपलब्ध होतील.
