महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
कंत्राटी कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषदेतून माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्ह्यात स्मार्ट मीटर (टीओडी) सर्व ग्राहकांना लावण्याचे काम महावितरण कंपनीने निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून काही खाजगी कंपन्यांना दिलेली आहे ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावलेला आहे त्या मिटरचे वाचन रिडरकडे वाचन करण्याकरता येत नाही. त्यामुळे मागील वीस-पंचवीस वर्षापासून मिटर रिडींग चे काम करणारे कामगार यांचा रोजगार हळूहळू हिरावला जात आहे. त्यामुळे (टीओडी) मिटर सरकारने लावू नये या मागणी करिता एम. एस. ई. डी. सी. एल. मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
गडचिरोली येथे सुद्धा विद्युत वीज वितरण कंपनीच्या कार्यालया पुढे धरणे आंदोलन सुरू आहे. सदर गंभीर बाबीचा सरकारने विचार करून त्यांना बेरोजगार होण्यापासून वाचवावे या मागणी करिता आज स्थानिक प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून मिटर रीडर व विज बिल वाटप काम करणाऱ्या कामगारांनी केली आहे.
कंत्राटी विद्युत मीटर रिडर कामगारांच्या वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा, समान काम- समान वेतन लागू करण्यात यावे हरियाणा राज्याच्या धर्तीवर कंत्राटमुक्त रोजगार प्रदान करण्यात यावे, किमान वेतन कायदाअंतर्गत कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी, राज्य शासनाची इतर देय भत्ते व सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे,याही मागण्या पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला मागण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेला रमेश जांगडे, अध्यक्ष महेश झोडे, प्रशांत खोब्रागडे, केवळराम दिवटे, लिलेश्वर ठाकरे, सुधाकर मुरमाडे, तागेश्वर शेंडे, आतिश लाकडे, अमोल वासनिक, अमोल दरडे, तेजराम मारबते, निलेश शिरवाडकर यांचेसह अनेक कंत्राटी कर्मचारी हजर होते.
