अप्पर-डिपर क्रिकेट स्पर्धेतून खेळाडूंना व्यासपीठ मिळाले – आमदार डॉ.देवराव होळी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ जानेवारी)
आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येक व्यक्तीने व्यायाम आणि खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अप्पर-डिपर ग्रुपने आपली परंपरा कायम ठेवत यावर्षीही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळ खेळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मी जिल्हा स्टेडियमच्या विकासासाठी आमदार म्हणून आपण सदैव कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार डॉ देवराव होळी व्यक्त केले.
येथील जिल्हा स्टेडियमवर रविवार, १४ जानेवारी रोजी अप्पर डिपर व्हॉट्स अँप ग्रुपतर्फे अप्पर डिपर क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, सिटी हॉस्पिटलचे डॉ.यशवंत दुर्गे, प्रेस क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष नंद किशोर काथवटे, अविनाश भांडेकर, बलराम सोमनानी, नगरपरिषद उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, डॉ. निखिल मंडलवार, अनुराग पिपरे आदीं उपस्थित होते. अप्पर डिपर व्हॉट्सअप ग्रुपतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेत चांद्रयान, शुक्रयान, अग्नी, मंगळयान, गगनयान आणि ब्रह्मोस इत्यादी संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघांना रोख बक्षिसे दिली जातील. उद्घाटन कार्यक्रमाला अप्पर डिपर ग्रुपच्या सदस्यांसह क्रिकेट स्पर्धेतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
