
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.८ डिसेंबर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि योजनांच्या लाभार्थींना यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सोमवार पासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करणार असल्याची माहिती स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेतुन दिली. महामृत्युंजय मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक व शेतकरी नेते रमेश भूरसे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या १७ महत्वपूर्ण योजनांची माहिती,त्याच्या लाभापासून किती नागरिक वेगवेगळ्या कारणांनी वंचित राहिले आहेत त्याची कारणमीमांसा व तात्काळ सोडवणूकीचे प्रयत्न. यासाठी प्रशासनाशी थेट संवाद. राज्य सरकारच्या ११ महत्वाकांक्षी योजनांच्या संदर्भात नागरिकांशी संपर्क व चर्चा करणे. महिला सशक्तीकरण अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे असे यात्रेचे स्वरूप आहे. या दरम्यान आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि पंचायत समिती मध्ये आढावा घेण्यासाठी दोन तास अधिकाऱ्यांसमवेत बैठक करणार आहेत. यातून शासनाच्या योजनांच्या लाभार्थी आणि वंचित यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
