दिभना येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी ठार

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
जिल्हा मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिभना परिसरात शेतात आलेल्या रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याला पायाखाली चिरडून ठार केले. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता च्या सुमारास घडली. होमाजी उर्फ ढेकलू गुरनुले (वय,५५) रा. दिभना असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
दिभना या गावापासून २ किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत आपल्या शेतात रात्री ८ वाजता च्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते.
रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते. कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला परंतु चवताळलेल्या हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागीच आपटले व त्यानंतर पायांनी तुडविले. यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.
सदर ५५ वर्षीय गुरूनुले या शेतकऱ्याच्या रानटी हत्तीच्या हल्ल्याने झालेल्या मृत्यू च्या घटनेने गावामध्ये वन विभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.
