उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यात हाणामारी
गडचिरोली (दि,२६ नोव्हेंबर)
शिवसेना दोन गटात झाल्यानंतर सध्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट याच्यात हाणामारीच्या बातम्या येत होत्या. मात्र गडचिरोलीत वेगळाच धक्कादायक प्रकार झालेला आहे. यात चक्क उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकामेकासोबत चांगलीच धक्काबुक्की, शिवागाळ व हाणामारी केली.
प्राप्त माहितीनुसार मुंबई येथून गडचिरोलीत निरीक्षणाकरिता उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना पाठविले होते. या प्रतिनिधींनी चामोर्शी मार्गावरील शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार व गडचिरोली विधानसभा संघटक नंदू कुुंमरे यांच्यात जुन्या गोष्टीवरून वाद सुरू झाला. या वादातून दोघांनीही एकमेकांना शिवागाळी करीत मारहाण केली. मारहाण सुरू असताना तेथील उपस्थित महिला पदाधिकारी कार्यालयातून पळ काढत रस्त्यावर आल्या. त्यानंतर आतमध्ये उपस्थित पदाधिकारी व रस्त्यावरील उपस्थित काही नागरिकांनी जाऊन दोघांना समाजावून दूर करून वाद संपुष्टात आणला. मात्र सदर मारहाणीची चर्चा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. दोन्ही पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त करीत आहेत
