फ्री सर्विसिंग च्या नावाने ग्राहकांची आर्थिक लूट ! श्याम होंडा गडचिरोली येथील प्रकार

गडचिरोली (दि,१० नोव्हेंबर)
ग्राहकाने वाहन खरेदी केल्यावर कंपनीकडे त्याला काही फ्री सव्र्हिसिंग दिल्या जातात. मात्र, काही शोरूममध्ये या फ्री सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांचीच लूट होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार येथील श्याम होंडा शोरूममध्ये घडला असून येथील व्हेईकल हेल्थ चेकअपच्या नावाखाली जीएसटी नमूद नसलेले बोगस बिलाविरोधात एका ग्राहकाने आवाज उठविल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
सद्य:स्थितीत प्रत्येकाकडे टू-व्हिलर वाहन असणे महत्त्वाचे झाले आहे. एकीकडे नवीन गाड्यांच्या किमतीत मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यात कंपनीकडून नवीन गाडी घेतल्यावर पाच फ्री सर्व्हिसिंगऐवजी आता तीन फ्री सर्व्हिसिंग करण्यात येत आहेत. मात्र वास्तविक ते असे नसून फ्री सर्व्हिसिंगच्या नावावाखाली ग्राहकांची सर्रासपणे लूट केली जात आहे. याबाबतची तक्रार गाडीमालकांकडून केली जात आहे. असाच प्रकार सोमवार (दि. ७) गडचिरोली येथील गाडी मालक राठी यांच्यासोबत घडला. दीपक राठी यांनी आपली दुचाकी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या भास्कर नावाच्या व्यक्तीद्वारे श्याम होंडा शोरूम येथे फ्री सर्व्हिसिंगकरिता दिली. सर्व्हिसिंग झाल्यानंतर राठी यांना बिल देण्यात आले. मात्र बिलाबरोबर एक छोटीशी पावतीसुद्धा देण्यात आली. त्या पावतीत मोटर व्हेईकल हेल्थ चेकअप आणि नायट्रोजन हवा असे एकूण १४० रुपयांचे बिल कोणत्याही प्रकारची जीएसटी न लावता देण्यात आले. संबंधित बिलाबाबत होंडा सर्व्हिसिंग सेंटरच्या मालकाला तसेच व्यवस्थापकाला विचारणा केली असता हे बिल आम्ही प्रत्येकालाच देतो, असे उत्तर देण्यात आले. तसेच वागणूकही चांगली देण्यात आली नाही. त्यानंतर होंडा कंपनीत या बाबतची तक्रार करण्यात आली. मात्र या तक्रारीचीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राठी यांनी आपल्या सोबत झालेल्या गैरव्यवहाराबाबतची माहिती दिली. जवळपास महिन्याला शेकडो वाहने फ्री सर्व्हिसिंगच्या नावाने श्याम होंडा शोरूम येथे जातात. मात्र प्रत्येकासोबत अशी आर्थिक लूट सर्रासपणे केली जात आहे. कोणत्याही प्रकारची जीएसटी नमूद नसलेले बिल माथी मारून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राठी यांनी पत्रकातून केली आहे. एकीकडे फ्री सर्व्हिसिंग आणि दुसरीकडे व्हेईकल हेल्थ चेकअपच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट ग्राहकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित होंडा शोरूमधारकावर कारवाई करावी. तसेच होंडा कंपनीनेदेखील अशा डिलरची डीलरशिप काढून घ्यावी, अशी मागणी होंडा कंपनीची वाहने विकत घेणार्या ग्राहकांकडून केली जात आहे.
‘‘संबंधित ग्राहकाला व्हेईकल हेल्थ चेकअप व हवेबाबत विचारणा करण्यात येते. तसेच ग्राहकांनी जर जीएसटी बिल मागितले, तर आम्ही ग्राहकांना जीएसटी बिल देतो.”
👆👆
सचिन अग्रवाल, संचालक, श्याम होंडा शोरूम, गडचिरोली
कल्पना न देताच दिले बिल…
आपल्याकडील व्यक्तीला वाहन घेऊन फ्री व्हेईकल सर्व्हिसिंगसाठी पाठविल्यावर शोरूमच्या संबंधित अधिकार्यांनी जॉब कार्ड बनविला. मात्र, व्हेईकल हेल्थ चकअप व नायट्रोजन हवेबाबची विचारणा करण्यात आली नाही. आधी कल्पना न देताच थेट साधे बिल देण्यात आले. या बिलात कोणत्याही प्रकारची जीएसटी नमूद नाही,
👆👆
ग्राहक राठी
