हे भंगारचे दुकान की, चोरांचा अड्डा ? मुख्य मार्गावरच अवैध व्यवसाय : बांधकामातील लोखंडी सळाख तसेच इतर धातूंचे विक्री
गडचिरोली (दि,२१ ऑक्टोंबर ):

कोणताही भंगार व्यवसाय म्हटले की, तिथे अनेक जुन्या टाकाऊ वस्तू दिसतात. हा व्यवसाय वरवर फार आकर्षक किंवा चकचकीत दिसत नसल्याने कुणी याकडे फारसे लक्ष देत नाही. पण, याच व्यवसायाच्या आडून शहरातील एक व्यावसायिक बांधकामासाठी वापरल्या जाणार्या सळाखी, वीजतारांमधील अॅल्यूमिनियम, तांबे व इतर धातू सर्रास खरेदी-विक्री करत आहे. विशेष म्हणजे या सळाखी व इतर साहित्य काहीजण त्याला चोरून आणून देत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे बबलू भांडेकर नावाच्या या भंगारवाल्याचे हे दुकान येथील गडचिरोली-धानोरा महामार्गावर एका मोठ्या कंपनीच्या मॉलला लागून आहे. तरीही त्याच्या अवैध व्यवसायाकडे कुणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल व कोणतीच कारवाई होत नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हे भंगारचे दुकान की, चोरांचा अड्डा, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
स्थानिक गडचिरोली-धानोरा मार्गावर बबलू भांडेकर नावाच्या या इसमाने काही वर्षांपूर्वी आपले भंगार खरेदी-विक्रीचे दुकान थाटले. पण, आपला व्यवसाय प्रामाणिकपणे न करता या दुकानाच्या आडून त्याने बांधकामातील सळाखी व इतर साहित्य विकणे सुरू केले आहे. सध्या गडचिरोली शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने घरांची बांधकामे सुरू आहेत. याशिवाय रस्ते व इतर विकासकामेही सुरू आहेत. या बांधकाम स्थळांवर बांधकामासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी सळाखी व इतर साहित्य ठेवलेले असते. हेच साहित्य काहीजण चोरून या व्यक्तीकडे आणून विकतात. किंबहुना या व्यक्तीनेच अशा प्रकारे साहित्य चोरी करायला माणसे ठेवली असावीत किंवा अशी एक टोळीच तयार केली असावी, असाही संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन या भंगार दुकानात पाहणी केली असता बांधकामातील लोखंडी सळाखी व इतर साहित्यासह अॅल्युमिनियम, तांब्याच्या ताराही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. या तारा जाळून त्यातील अॅल्युमिनियम व तांबे गोळा करून विकले जाते. अशा प्रकारे अॅल्युमिनियम व तांबे विकता येत नाही. शिवाय या व्यक्तीकडे कुठलाही अधिकृत परवाना नसल्याची माहितीही मिळाली आहे. शिवाय हे भंगारचे दुकान मुख्य महामार्गावर आहे. या दुकानातून वाहनांची वेगाने ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेकदा येथे अपघात होत असतात. दुर्दैवाने मोठी घटना घडली आणि अनेकांची प्राणहानी झाली, तर जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या भंगार दुकानाची तपासणी करून व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात भंगार दुकानदार बबलू भांडेकरशी फोनवर संपर्क साधला असता त्याने प्रतिसाद दिला नाही.

वरदहस्त कुणाचा ?
भंगारचा व्यवसाय करणारा हा व्यावसायिक महागड्या बुलेटवर बसून शहरातून ऐटीत फिरत राहतो. हा व्यवसाय करताना मला अनेक अधिकारी, कर्मचार्यांचे खिसे गरम करावे लागतात. माझा महिन्याचा त्यांच्यावरचाच खर्च दीड लाखाच्या वर आहे, असेही तो खासगी काहीजणांशी बोलत असल्याचे कळते. त्यामुळे त्याला कुणाचा वरदहस्त मिळाल्याने तो ही अवैध कामे करत आहे, याचाही शोध संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे.

वृत्त संकलन,,निलेश पटले
