शिवम कैलाशचंद राठी याची शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३० सप्टेंबर)
नागपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर व नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत गडचिरोली येथील रोशन चेस अकादमीचा विद्यार्थी शिवम कैलाशचंद राठी याने उल्लेखनीय कामगिरी करीत तिसरा क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवमने एकूण ६ सामने खेळून ५ गुणांची कमाई केली. त्याने ४ सामने जिंकले तर २ सामने नागपूरचे बलाढ्य खेळाडू साहेजवीर सिंग मारस (रेटिंग १८४५) व सिद्धार्थ बंग (रेटिंग १६९७) यांच्याशी बरोबरीत खेळले. ही त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे.
शिवम रोज ६ ते ७ तास चिकाटी, जिद्द व एकाग्रतेने बुद्धिबळाचा अभ्यास आणि सराव करतो. आपल्या यशाचे श्रेय त्याने राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक रोशन सहारे तसेच आई-वडिलांना दिले आहे.ग
गडचिरोली जिल्ह्याचा मान उंचावणाऱ्या शिवमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
