जाहिरात
आपला जिल्हा

घर पाडून घरकुल बांधले.पण हप्तेच रोखले!

घरकुल लाभार्थ्यासाठी निधी दया मिलिंद खोब्रागडे यांची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,आरमोरी (दि. २० जून)

नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर अनेक गरीब लाभार्थ्यांनी स्वतःचे जुनाट राहते घर पाडून नव्याने घरकुल बांधकाम सुरू केले. शासनाने वेळेवर निधी देईल या विश्वासावर त्यांनी आयुष्यभराची सुरक्षितता असलेले घर स्वतःच्या हाताने जमीनदोस्त केले. मात्र सत्ताधारी सरकारच्या निष्क्रियतेमुळे आज हेच गरीब लाभार्थी उघड्यावर पडण्याच्या मार्गावर आहेत.

घरकुल बांधकाम सुरू असताना वेळेवर हप्ते न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या कुटुंबांना भाड्याच्या खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने बांधकाम अपूर्ण असलेल्या घरात राहणे अशक्य आहे आणि भाड्याची खोली सोडण्याचीही कोणतीच शक्यता उरलेली नाही.
दोन आघाड्यांवर आर्थिक मार एकीकडे शासनाकडून हप्ते मिळत नाहीत, तर दुसरीकडे भाड्याच्यां खोल्यांचे दर महिन्याचे भाडे, वीज-पाणी खर्च, आणि बांधकामासाठी घेतलेली उसनवारी…या तिहेरी आर्थिक मारामुळे सर्वसामान्य गरीब नागरिक अक्षरशः चिरडले जात आहेत. आधीच मजुरी, अल्प उत्पन्नावर जगणाऱ्या कुटुंबांवर आता भाड्याच्या खोलीचा अतिरिक्त बोजा बसत असून हे ओझे त्यांच्या क्षमतेच्या बाहेर गेले आहे.

खेळाच्या खोलीत राहून घरकुलाची स्वप्ने? काही लाभार्थ्यांना अत्यंत लहान, असुरक्षित आणि निकृष्ट खोल्यांमध्ये कुटुंबासह राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे हाल होत असून, घरकुल योजना “सुरक्षित निवारा” देण्याऐवजी “असुरक्षित जीवन” देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहरातील एकूण ६७७ लाभार्थ्यांपैकी ५४५ जणांना पहिला हप्ता (१ लाख रुपये) मिळाला.केवळ ६५ जणांना दुसरा हप्ता (१ लाख रुपये) मिळाला.परंतु वास्तव असे की, सुमारे ५०% लाभार्थ्यांना अजूनही पहिला हप्ता मिळालेला नाही.जवळपास ४५० लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत इतकी गंभीर परिस्थिती असूनही सत्ताधारी सरकार ढिम्मपणे पाहत आहे, ही बाब संतापजनक आहे.
हप्ते मिळतील या अपेक्षेने अनेक लाभार्थ्यांनी बांधकाम साहित्य आधीच खरेदी करून ठेवले आहे. मात्र पावसामुळे हे साहित्य खराब होण्याची शक्यता असून, याची भरपाई कोण करणार? सरकार की गरीब लाभार्थी?
घरकुल देऊन पैसे न देणे म्हणजे थेट फसवणूक
घरकुल मंजूर करून निधी रोखणे म्हणजे गरिबांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे. “घरकुल सर्वांसाठी” ही घोषणा आता फक्त जाहिरातबाजीपुरती मर्यादित राहिली असून प्रत्यक्षात मात्र ही योजना गरीबांची थट्टा बनली आहे, असा तीव्र आरोप केला जात आहे.

उर्वरित सर्व लाभार्थ्यांना तात्काळ पहिला व दुसरा हप्ता अदा करावा, भाड्याच्या खोलीत अडकलेल्या कुटुंबांना दिलासा द्यावा.घर पाडून विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या गरिबांना जर भाड्याच्या खोलीत आयुष्य कंठावे लागत असेल, तर हा विकास कुणासाठी आहे? हा प्रश्न आज पडला आहे. घरकुलधारकांना तात्काळ निधी दिला गेला नाही तर तालुका काँग्रेस आरमोरी च्या वतीने सत्ताधारी सरकारविरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी दिला जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button