
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १६ नोव्हेंबर)
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमार्फत राज्यात शून्य कुष्ठरोग प्रसाराचे (Zero Leprosy Transmission) ध्येय २०२७ पर्यंत गाठण्यासाठी “कुष्ठरुग्ण शोध अभियान (LCDC)” हा विशेष उपक्रम १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या साठी गडचिरोली जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची सभा शुक्रवार दि. १४ रोजी संपन्न झाली.हे अभियान १४ दिवसांचे असून, याचा मुख्य उद्देश समाजात निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे आणि संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा प्रसार कमी करणे हा आहे.
हे अभियान जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामीण भाग व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.
अभियानाचे स्वरूप आणि आवाहन
!!!
या अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत घरोघर सर्वेक्षण करण्यात येईल.
घरोघर सर्वेक्षण : पथक घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत शारीरिक तपासणी करेल.
संशयित रुग्णांची तपासणी: त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, जाड त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, किंवा हात-पायांना बधीरपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्यांची नोंद संशयित रुग्ण म्हणून केली जाईल.
निदान आणि उपचार: आढळून आलेल्या संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकारी ७ दिवसांच्या आत करून घेतील आणि निदान निश्चित होताच तातडीने बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येईल.
अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी गडचिरोली
!!!
“कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आहे. या अभियानादरम्यान घरोघर तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करून घ्यावी. लवकर निदान, म्हणजे लवकर उपचार आणि निरोगी जीवन!”
सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली
!!!
“हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, ग्राम विकास, महिला व बाल कल्याण यासह विविध विभागांचे सहकार्य घेण्यात आले आहे. समाजाने देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत करावी.
डॉ. प्रताप शिंदे, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली
!!!
“या १४ दिवसांच्या काळात आरोग्य पथके आपल्या घरातील सर्व सदस्यांची (स्त्री-पुरुषांची) तपासणी करतील. कृपया पथकास योग्य माहिती द्या आणि कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास ती त्वरित सांगा, जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.
डॉ. सचिन हेमके
सहाय्यक संचालक (कुष्ठरोग),
गडचिरोली
!!!
कुष्ठरोग हा लवकर निदान झाल्यास पूर्णपणे बरा होतो आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही संकोचाशिवाय तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
