नोकरीचे आमिष दाखवून जमिनी खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ ऑगस्ट)
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, ईल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कड्डा देव आमगाव, घोट, आरमोरी, वडसा आदी भागात शेतजमिनीची परस्पर खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला असून आम्हाला तुम्ही जमीन विक्री करा आम्ही तुम्हाला योग्य मोबदला व नोकरी मिळवून देवु असे खोटे आश्वासन देवुन फसवणुक करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.
काही शेतकरी या आमिषाला बळी पडले असून जोपर्यंत एम. आय डी.सी उद्योगासाठी जमीन अधिग्रहणाचा आदेश पारित करीत नाही तो पर्यंत शेत जमीन मालकांनी खाजगी व्यक्तींना परस्पर जमिनी विक्री करून स्वतः ची फसवणुक करुन घेवू नये व जमीन खरेदी करणारे दलाल दिशाभूल करून शेतजमीन खरेदी साठी आल्यास माझ्याशी संपर्क करा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे.
उद्योगासाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास एम. आय डी.सी जमीन अधिग्रहित करण्याचा आदेश पारित करते व विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शेत जमीन मालकांना मोबदल्याची हमी देवून व ज्या उद्योगासाठी जमीन अधिग्रहित होणार आहे त्या उद्योग प्रकल्पात नोकरीची हमी देवूनच जमीन खरेदी विक्री ची प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र जिल्हयाच्या विविध भागात अशी परस्पर जमीन खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाल्याने अनेक शेतजमीन मालकांची फसवणुक झाली असून जमीन मालकांनी अशी परस्पर खरेदी विक्री ची प्रक्रिया पार पाडून स्वतच्या पायावर दगड मारून घेवू नये. अशी विनंती माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली आहे.
