गडचिरोली (२१ जुलै)
संपूर्ण गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गडचिरोली जिल्हा शाखेने केली आहे. पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन सादर केले.
मागील पंधरा दिवसात गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या भयंकर पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागात पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली येऊन नष्ट झाले काही शेतकऱ्यांचे रोवने सुद्धा पुरामुळे होऊ शकले नाही. अनेक लोकांचे घरे क्षतीग्रस्त झाले आणि घरातील सामान वाहून गेले नासधूस झाली त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता अत्यंत हवालदिल झाली असून त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. असे निवेदनात म्हटले आहे
तेव्हा महाराष्ट्र शासनाने झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून संपूर्ण गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नागरिकांना दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
त्याचप्रमाणे पूरपरिस्थितीमुळे अनेक भागात रोगराई पसरण्याची भीती असून दुर्गम भागात आरोग्य सुविधा वेळेवर व पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याने त्या भागातील नागरिकांची बरीच गैरसोय होत आहे. तरी अशा लोकांना तातडीने आरोग्य सेवा पुरविण्यात याव्या व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्यास निर्देश देण्यात यावे अशीही मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. या शिष्टमंडळात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, कार्यालयीन सचीव अशोक खोब्रागडे, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौधरी, युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस पुण्यवान सोरते, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वनमाला झाडे, उपाध्यक्षा ज्योती चौधरी, सुरज गावतुरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
