जाहिरात
गडचिरोलीसामाजिक

दवंडी येथे अंंधश्रद्धा निर्मूलन जागृतीपर कार्यक्रम संपन्न.

Spread the love

गडचिरोली ( दि,१३ जून)
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली, अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील दवंडी येथे युवक कल्याण योजने अंतर्गत समाजसेवा शिबीरा मार्फत अंंधश्रद्धा निर्मूलन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री बग्गूजी ताडाम , प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री कुमरे साहेब तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे राज्य स्तरीय वैज्ञानिक जाणिव शिक्षण प्रकल्प चे सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, शहर सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह श्री उपेंद्र रोहनकर, शहर शाखेचे सदस्य श्री समीर शेख आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री ताडाम साहेब यांनी अंंधश्रद्धेमुळे लोकांचे कसे नुकसान होते यावर भाष्य करताना म्हणाले की, बुवा, बाबा ,महाराज व मांत्रिक हे लोकांना केवळ मुर्ख बनववतात. आजारी पडल्यानंतर रुग्णांना लोकांनी दवाखान्यात नेले पाहिजे. जेव्हा गावगाड्यात दवाखान्याच्या सोईसुविधा नव्हत्या तेव्हा वैदू, मांत्रिक, बुवा बाबा यांच्या शिवाय कदाचित आपल्याला पर्याय नव्हता , पण आज तसे राहिले नाही. गाव तेथे नर्स अंगणवाडी सेविका आणि औषधोपचारासाठी फार कमी अंतरावर दवाखाने उपलब्ध आहेत तेव्हा तेथेच जाऊन उपचार करावा असे आवाहन केले. श्री रोहनकर सर यांनी अंंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित स्वरचित तथा चळवळीचे गीत सादर करून अंंधश्रद्धेमुळे आपले आर्थिक नुकसान होते वेळप्रसंगी जीव गमवावे लागते म्हणून कोणत्याही देविदेवतांच्या किंवा मांत्रिकाच्या नादी लागू नका असे मत व्यक्त केले. श्री निंबोरकर यांनी “वारसा संत समाजसुधारकांचा, अंंधश्रद्धा निर्मूलनाचा” या अभियानाच्या माध्यमातून अंंधश्रद्धा निर्मूलनासाठी गेल्या अडीच हजार वर्षांपूर्वी पासून तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो वैज्ञानिक दृष्टिकोन दिला तोच पुढे संत ज्ञानेश्वर, जगतगुरु संत तुकाराम महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, वंदनीय संत तुकडोजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ते पद्मभूषण शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी तो पुढे कसा व का आणला हे सांगून त्यांनी समाजातील चुकीच्या प्रथे विरोधात जे अभियान राबविले त्याची विस्तृत माहिती दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोरात सुरू आहे. “भूत भानामती करणी मूठ, विज्ञान सांगते सारे आहे झुठ” असे सांगून अंंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादुटोणा विरोधी कायदा, जातपंचायत विरोधी कायदा, यांची माहिती देऊन असे कोणी भोंदूगिरी करणारे आढळल्यास आपण देखील पोलीसात तक्रार दाखल करू शकता किंवा गरज पडल्यास आमची मदत घेऊ शकता असे आवाहन केले. श्री कोठारे यांनी बुवा बाबा महाराज हे चमत्कार दाखवून सर्व सामान्य नागरिकांना कसे मुर्ख बनवितात ते प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून दाखविले. आणि हे धुर्त लोक खास करून महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक, मानसिक व लैंगिक शोषन कसे करतात याचे किस्से ऐकविले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पैकी एका महिलेला प्रतिक्रिया देण्यासाठी सांगितले असता ती म्हणाली की, या ठिकाणी जे मार्गदर्शन केले ते खरे आहे. गावात कोणी बिमार पडले का आम्ही पेशंटले दवाखान्यात न नेता गावातल्या मांत्रिकाले बोलावतून नाही तर देवी आणणाऱ्या भक्तीनमायकडे नेतून. मग ते सांगते का याले बाहेरचा आहे, फलान्यानं याले केला आहे, कोंबडी द्या लागते. इतक्या वारी करा लागतील. आणि काही गुण नाही दिसला का मग दवाखान्यात जातून . डॉक्टर साहेब म्हणतेत बिमारी वाढून आहे. कार्यक्रम छान झाला. अंंधश्रद्धा काय असते आम्हाला माहिती झाली. यांच्यानंतर नक्कीच मांत्रिक बुवा बाबा यांच्या कडे पेशंटले न नेता दवाखान्यात नेतील अशी आशा व्यक्त केली. अभिनव बहुउद्देशीय कला मंच या संस्थेचे अध्यक्ष श्री अकील शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सुत्रसंचलन केले. तर आभारप्रदर्शन सौ मंदिरा किरंगे हीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री निकेश ताडाम व संपत किरंगे यांनी परीश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button