महात्मा गांधी विद्यालय मुरखळा येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली(दि,४ ऑगष्ट)
शहरालगत असलेल्या मूरखडा येथील महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने सापाविषयी जनजागृती पर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री आर फुकट तर मार्गदर्शक म्हणून महा अनिसचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर , जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक विलास पारखी, महा अनिस शाखा नवेगाव चे उपाध्यक्ष सौ.सुधा चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री हरिदास कोटरंगे उपस्थित होते. श्री निंबोरकर यांनी मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, ते सांगून अंधश्रद्धा हा मानवी विकासातील व प्रगतीतील एक अडसर आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारल्याने आपल्या जीवनातील अंधश्रद्धा गळून पडून आपला सर्वांगीण विकास व प्रगतीचा मार्ग सुकर होऊ शकते निसर्गातील घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची एक नवीन पद्धत मिळून घटनेमागील कार्यकारणभाव समजते त्यामुळे प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासने गरजेचे आहे याविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. सापाविषयी असलेले समज गैरसमज सापाचे, विविध प्रकार, सापापासून घ्यावयाची सावधगिरी, सापाचे वास्तव्य, सर्पदंशानंतर रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोचवीत असताना करावयाचे प्रथमोपचार याविषयी श्री पारखी यांनी विस्तृत माहिती दिली. श्री कोठारे यांनी मुलांना चमत्कारावर आधारित काही प्रात्यक्षिके करून दाखविली तर श्रीमती चौधरी यांनी मुलींच्या आरोग्याविषयी माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री फुकट सर यांनी महा अनिसच्या कार्यकर्त्यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतले असून विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग स्वतःसाठी तसेच समाजातील इतर घटकापर्यंत पोहोचवून सापाला न मारता ते वाचविणे का गरजेचे आहे हे समजून सांगावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. श्री कोटरंगे यांनी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुरेपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन श्री मस्के सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व कर्मचारी श्रीमती बेद्रे मॅडम, श्री महाकुडकर सर, श्री देशमुख, श्री सोनवणे, श्री दुरुगकर , श्रीमती पिल्लारे मॅडम आदिंनी सहकार्य केले. श्री गोपाल नखाते, भोईना, सुरपाम यांनी विशेष मेहनत घेतली.
