गडचिरोली : एचपी गॅसचा तुटवडा तीव्र
उज्ज्वला योजनेतील सिलेंडर ब्लॅकमध्ये विक्रीचा नागरिकांचा आरोप

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ११ डिसेंबर)
गडचिरोली शहरात गेल्या महिन्याभरापासून एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा गंभीर स्वरूप धारण करत असून सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांचे स्वयंपाकघर अक्षरशः बंद पडण्याची वेळ आली आहे. तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर ब्लॅकमध्ये विक्री केल्याचा धक्कादायक आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या अवैध व्यवहारातून संबंधित एजंट मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
सिलेंडर मिळत नसल्याने महिलांचे हाल
!!!
गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीसमोर महिलांची मोठी प्रतीक्षा रांग सकाळपासून लागत आहे. अनेक वेळा एजन्सीमध्ये जाऊनही सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगून ग्राहकांना परत पाठवले जात असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. “आम्ही रोज एजन्सीकडे फेऱ्या मारतो, पण सिलेंडर नाही असेच उत्तर मिळते. घरात स्वयंपाकाच्या वस्तू असूनही गॅस नसल्याने आम्हाला भुकेल्या पोटी राहावे लागत आहे,” अशी भावना एका महिला ग्राहकाने व्यक्त केली.शहरातील लोक पहाटे ५ वाजता पासुन सिलेंडर घेण्याकरिता एजन्सी समोर रांगा लावून उभे असतात.
उज्ज्वला योजनेतील सिलेंडर ब्लॅकमध्ये?
!!!
नागरिकांच्या मते, उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दिले जाणारे सबसिडीचे सिलेंडर गुपचूपपणे ब्लॅकमध्ये विकले जात आहेत. सिलेंडरचा दर साधारणपेक्षा अधिक आकारला जात असल्याचीही माहिती नागरिकांनी दिली आहे. “सरकारने गरीबांसाठी दिलेल्या योजनेचा गैरफायदा घेतला जात असून यामध्ये काही एजंट आणि मध्यस्थांचा सहभाग आहे,” असा आरोप स्थानिकांनी केला.
गॅस कंपन्यांकडून माहिती दडवली जात असल्याचा संशय
!!!
तुटवड्याबाबत एजन्सींकडे विचारणा केल्यावर “पुरवठा कमी आहे”, “वाहतूक अडचणींमुळे गॅस येऊ शकला नाही” अशी कारणे देण्यात येत आहेत. मात्र सलग दहा दिवस पुरवठा खंडित राहणे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तपास करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
ग्राहकांची प्रशासनाकडे मागणी
!!!
संकट अधिक गंभीर होण्यापूर्वी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, ब्लॅक मार्केटिंगवर तातडीने छापे टाकावेत, संबंधित एजंटांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी प्रशासनाकडे केली आहे. गॅससारख्या मूलभूत सेवांमध्ये अनियमितता सहन केली जाणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रशासन काय म्हणते?
!!
या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध नसली तरी नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने प्रशासन लवकरच लक्ष घालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
