गडचिरोली : १३ पिलांसह डुरक्या घोणस सापाचे यशस्वी रेस्क्यू
सर्पमित्रांकडून सुरक्षित जंगलात मुक्तता

लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि. ३१ मे):
नवेगाव येथील रहिवासी दिलीप आचारी यांच्या घर परिसरात सुमारे एक वर्षापासून डुरक्या घोणस अर्थात मातिखाया जातीचा साप वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र अजय कुकडकर यांना दिली. घराजवळ सतत सापाचा वावर दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहिती मिळताच सर्पमित्र अजय कुकडकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठिकाणाची बारकाईने पाहणी केल्यानंतर एका सुरक्षित जागेत मातिखाया जातीचा प्रौढ साप आढळून आला. त्याच ठिकाणी शोधमोहीम राबवित असताना सापाची तब्बल १३ पिलेही आढळून आली. एवढ्या मोठ्या संख्येने पिले आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सर्पमित्रांनी अत्यंत दक्षता व कौशल्याने साप आणि त्याच्या सर्व पिलांना पकडले. रेस्क्यूदरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा इजा होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानंतर साप व त्याची सर्व पिले सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यात आली.
यावेळी सर्पमित्र अजय कुकडकर यांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अनेक साप पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून उंदीर व इतर कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे सापांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बचाव कार्यात सर्पमित्र अजय कुकडकर यांच्यासह विशाल आचारी, सौरभ सातपुते, योगेश हजारे, अनुप म्हशाखेत्री व अनिकेत उरकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
