जाहिरात
क्राईम

गडचिरोली : २४ वर्षीय तरुणाचा खुल्या मैदानात आढळला मृतदेह

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३ मे )

शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालया शेजारी असलेल्या खुल्या पटांगणात रविवारी (दि.०३) सकाळी ८ वाजता दरम्यान एका २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी फेरफटक्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत युवकाची ओळख पटली असून, त्याच्या मृत्यूमागे हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

हरबचन खन्ना पटवा (वय २४), रा. गोकुळनगर, गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी उशिरा रात्री ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हरबचन हा दारू विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

हरबचनची हत्या अन्य कोणत्या तरी ठिकाणी करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या पटांगणात आणून टाकण्यात आला असावा, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे पटवा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. दरम्यान, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह तिथून हलवण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू असून, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि कोणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप या प्रकरणी ठोस माहिती समोर आली नसली तरी, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button