जाहिरात
एटापल्ली

आदिवासी बहिणींचा प्रेरणादायी आदर्श : वडिलांच्या स्मरणार्थ गाववेशीवर उभारला पुतळा!

एटापल्ली तालुक्यातील दोलंदा गावातील कोरचा कुटुंबातील कन्यांनी समाजासमोर घडवला संस्कारांचा आदर्श

Spread the love

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि. १६ डिसेंबर)

आई-वडिलांच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद, तंटे, न्यायालयीन संघर्ष आणि गुन्हेगारी घटनांचे वाढते प्रमाण समाजात चिंतेचा विषय ठरत असताना, एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गाव दोलंदा येथील कोरचा कुटुंबातील कन्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक वेगळाच, प्रेरणादायी आणि संस्कारप्रधान आदर्श उभा केला आहे.

दोलंदा गावातील माजी भूम्या (गाव पुजारी) स्व. चमरा तुला कोरचा यांच्या निधनानंतर त्यांच्या पाच कन्यांनी कोणताही वाद न करता, संपत्तीपेक्षा संस्कार आणि स्मृती अधिक मौल्यवान मानत वडिलांच्या सामाजिक कार्याची आठवण जपण्यासाठी थेट गावाच्या वेशीवर त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.

स्व. चमरा तुला कोरचा हे तब्बल २१ गावांचे भूम्या (पूजारी) म्हणून कार्यरत होते. आदिवासी समाजातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. समाजातील सलोखा टिकवणे, रूढी-परंपरा जपणे तसेच आदिवासी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, हे त्यांचे आयुष्यभराचे कार्य होते.

१ जानेवारी १९४४ रोजी जन्मलेले चमराजी तुलाराम कोरचा हे मूळचे छत्तीसगड राज्यातील संगम येथील रहिवासी होते. इंग्रज राजवटीच्या काळात ते स्थलांतरित होऊन दोलंदा गावात आले आणि तेव्हापासून याच गावाशी एकरूप झाले. सुमित्रा, चंदा, तुलसी, तेजस्विनी आणि पार्वती अशा त्यांच्या पाच कन्या आहेत. मुलगा नसतानाही कन्याच कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या.

१४ डिसेंबर २०२३ रोजी चमराजी कोरचा यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या जाण्यानंतरही वडिलांचे कार्य, त्यांची शिकवण आणि समाजासाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उदात्त हेतूने पाचही बहिणींनी गाववेशीवर वडिलांचा पुतळा उभारण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला.

या पुतळ्याचा १४ डिसेंबर रोजी दोलंदा गावात साध्या पण भावनिक वातावरणात लोकार्पण सोहळा पार पडला. पुतळ्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, येथे सुंदर बगीचा उभारण्यात येणार आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्याचा मानस स्व. चमराजी कोरचा यांची कन्या चंदा कोरचा यांनी व्यक्त केला. चंदा कोरचा या स्वतःही सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देत आहेत.
आदिवासी समाजात मृत्यूनंतर समाधी बांधण्याची परंपरा असताना, सामान्य आदिवासी कुटुंबातील या पाच बहिणींनी वडिलांचे कार्य समाजासमोर सदैव तेवत राहावे, या हेतूने पुतळा उभारून एक वेगळाच सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.

पुतळा अनावरण प्रसंगी माजी इलाखा प्रमुख महादू दुगा, गडवा कुमोटी (छत्तीसगड), परमेश्वर गावडे (सरपंच, दुर्गापूर), गोसू कोरचा, नेवसू कोरेट्टी, सुकराम कोरेट्टी, बुधराम कोरेट्टी, मसूरू पाटील पोटावी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव कोडापे, सामाजिक कार्यकर्ते योगेश कुमरे, रैन हिचामी, शिशू नरोटे, मनोज झुरी, रमेश आतला, कमलानाई सिडाम, सुकोबाई पोटावी, सोमाजी आतला यांच्यासह विविध गावांतील ग्रामसभा सदस्य, इलाखा सदस्य, गावकरी, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलींनी दाखवलेली एकजूट, संस्कार आणि वडिलांप्रती असलेली कृतज्ञता पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
संपत्तीपेक्षा संस्कार, नाती आणि स्मृती अधिक मौल्यवान असतात, हा मोलाचा संदेश या घटनेतून समाजाला मिळाला आहे.आजच्या ताणतणावपूर्ण सामाजिक वातावरणात दोलंदा गावातील या आदिवासी बहिणींनी उभारलेला हा पुतळा केवळ वडिलांची स्मृती नसून, तो समाजासाठी एक जिवंत प्रेरणास्थळ ठरत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button