जाहिरात
आपला जिल्हा

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करावा : सीईओ सुहास गाडे

विज्ञान दिंडीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १५ नोव्हेंबर)

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञान निष्ठा जपावी. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करून जीवन सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

शहरातील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूल येथून विज्ञान दिंडी शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास काढण्यात आली. या दिंडीला हिरवी झेंडी दाखविताना ते बोलत होते. यावेळी समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जि.प. शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकुंद मशाखेत्री व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, अनेक महान वैज्ञानिकांच्या जीवन चरित्रातून लक्षात येते की, या वैज्ञानिकांत विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टी होती. आजचे युग हे विज्ञान युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, बालवैज्ञानिक व शिक्षक तथा त्यांच्या प्रतिकृतींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत गडचिरोली-चंद्रपूर जिल्हा विज्ञानप्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबर रोजी ‘डॉ. कमल रणदिवे विज्ञाननगरी’ अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वैज्ञानिक होण्याची संधी साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

आजही विविध सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. आपल्याला यावर मात करून विज्ञाननिष्ठ होणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमता आहे. त्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून शिक्षकांनी त्यांना चालना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे, यातूनच चांगले शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतात, असेही सीईओ गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, विज्ञान दिंडीत शहरातील विद्याभारती कन्या हायस्कूुल यांच्यावतीने विज्ञान पालखी व डॉक्टर विक्रम साराभाई यांची वेशभूषा तसेच अवकाश उपग्रह देखावा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांचेकडून विज्ञान झाकी व ओझोन थराच्या क्षयामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम, उपाययोजना व फायदे, भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तर्फे वैज्ञानिक झाकी, राणी दुर्गावती कन्या तथा कला कनिष्ठ महाविद्यालय तर्फे स्वच्छतेवर आधारित पथनाट्य आदींसह विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांची २००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते त्याचबरोबर अनेक शाळांनी विविध वैज्ञानिक विज्ञान प्रतिकृती तयार केल्या होत्या विद्यार्थी वेशभूषेत होते विविध शाळांची बँड पथक विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक नारे/ घोषणा त्यामुळे एक विज्ञान विषयक वातावरण रॅली दरम्यान निर्माण झाले व शहरातील जनतेने घराबाहेर पडून मोठ्या उत्स्फूर्त्याने विज्ञान रॅलीचे दर्शन घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button