आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे घोट परिसरातील समस्या सोडविण्या संदर्भात आंदोलन

लोकशाही न्युज,चामोर्शी (दि. १० सप्टेंबर)
जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या नूतनीकरणासह घोट भागातील सर्वांगीण विकासासाठी या भागातील प्रलंबित समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. १०) राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
घोट, रेगडी भागातील १४ गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय करण्यात यावी, अतिक्रमण जमिनीचे पट्टे तत्काळ देण्यात यावे, घोट तालुक्याची निर्मिती करावी, साखरदेव देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे.
मुतनूर व कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करावा, घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, घोट भागात उद्योग उभारावे, चामोर्शी-मूल मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, अहेरी तालुक्यातील दयनीय स्थितीतील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, पोहर नदीवरील पुलाजवळील रस्त्याची दुरुस्ती करावी, सुरजागड व कोनसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य द्यावे, दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाचे खोलीकरण करावे, चामोर्शी तालुक्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, मछली, चापलवाडा बस सुरु करावी, घोट-नवेगाव मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, दिना धरण परिसर सौंदर्योंकरण करावे, चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करावे, आदींसह विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोट येथे बुधवारी विराट जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश गेडाम करणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
