जाहिरात
अंधश्रद्धाब्रेकिंग न्युज

मिठाई दुकानावर जादूटोण्याचा प्रयोग, गडचिरोली शहरातील घटना

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२२फेब्रुवारी)

गडचिरोली जिल्ह्यातही चमत्कार आणि जादूटोण्याचे, तंत्र, मंत्राचे प्रकार दिसून येत आहेत. येथील गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर शहर पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या बिकानेर मिठाई दुकानावर जादूटोण्याचा प्रयोग झाल्याचे उघडकीस आले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

(वरील व्हिडिओमध्ये जादूटोण्याचा प्रयोग करताना )

या दुकानातून मिठाई खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे.
एकीकडे विज्ञान युगात मानव चंद्रावर गेला असून मंगळावरही जाण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अद्याप मंत्र, तंत्र, जादूटोण्यासारख्या अवैज्ञानिक व आधारहीन बाबींचा आधार घेण्यात येत असल्याचे दिसत आहे.

गडचिरोली येथील पोलिस स्टेशन समोरील बिकानेर मिठाई दुकानात जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आल्याचा आरोप बिकानेर मिठाई दुकानाच्या मालकाने केला आहे. दुकान मालकाच्या आरोपानुसार रात्रीच्या वेळेस शॉल अंगावर घेऊन चेहरा झाकलेली एक व्यक्ती दुकानात लाल कपड्यात बांधलेली वस्तू व इतर साहित्य टाकून जादूटोणा तंत्रविद्या करत आहे. ही व्यक्ती काहीतरी मंत्र पुटपुटत सर्व साहित्य दुकानात टाकते व निघून जाते, असे दुकानातील सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
विशेष म्हणजे दुकानमालकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तसेच आपल्या दुकानावर मोठी तंत्रविद्या झाल्याचेदेखील आपल्या ऑडिओ क्लिपमधून सांगितले आहे. त्यामुळे आता तंत्रविद्या झालेल्या या मिठाई दुकानातून मिठाई खरेदी करणे ग्राहक टाळत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी कोणत्याही शुभकार्याकरिता मिठाई खरेदी करून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटत असते. मात्र एखाद्या दुकानावर तंत्रविद्या म्हणजेच जादूटोण्याचा प्रयोग केल्याचे स्वतः दुकानदारच सांगत असल्याने आणि या सर्व प्रकाराची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने अनेक अंधश्रद्ध, पापभीरू ग्राहक या दुकानापुढून जाणेही टाळत आहेत. अनेक ग्राहकांनी जादूटोणा झालेल्या दुकानातून मिठाई कशी खरेदी करावी, हा प्रश्न दबक्या आवाजात उपस्थित केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम, अतिदुर्गम भागांत तंत्रमंत्राचे, अंधश्रद्धेचे प्रकार दिसून येत असले तरी शहरात अशा प्रकारचा जादूटोण्याचा प्रकार प्रथमच बघायला मिळत आहे. शिवाय दुकान मालकानेच जादूटोणा झाल्याबाबतची कबुली देत व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे अनेक अंधश्रद्ध ग्राहकांची घाबरगुंडी उडाली आहे. पश्चिम भारतातील राज्यात असे प्रकार घडत असतात.
मात्र गडचिरोलीत असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरात पूजा असो अथवा नवीन वस्तूची खरेदी असो किंवा इतर अनेक शुभकार्यांकरिता मिठाई खरेदी करण्यात येते. त्यामुळे जादूटोण्याचा प्रयोग झालेल्या दुकानातून मिठाई कशी खरेदी करावी, असा प्रश्न अनेकांना ग्राहकांना पडला आहे. शिवाय हा प्रकार इतर कुणी सांगितला असता तर कदाचित ग्राहकांनी फारसा विश्वास ठेवला नसता. मात्र, स्वतः दुकानदारानेच आपल्या दुकानात मोठी तंत्रविद्या झाल्याची कबुली देत व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे, याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button