गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय रस्ते व इतर बांधकामाचे काम स्थानिक कंत्राटदारांना द्या
कंत्राटदाराची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २८ जुलै)
पालकमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रस्ते व इतर बांधकामात असलेल्या जाचक अटी रद्द करून फेरनिविदा कराव्यात जेणेकरून स्थानिक कंत्राटदारांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी आज सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स (दि. २८ जुलै) येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.
विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते व इतर बांधकामे अविरत सुरू आहेत,परंतु सध्या गडचिरोली जिल्ह्यात एका कंपनीने नुकताच अनुभव नसतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर यांचा हातातील कामे स्वतः घेऊन कामे सुरू करण्याचा घाट सुरू केला आहे व या कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जिल्ह्यात एका माजी अधीक्षक अभियंता व बांधकाम विभागातील काही कर्मचारी यांना हाताशी घेऊन नियमांना धाब्यावर बसवून स्थानिक कॉन्ट्रॅक्टर यांचे कामे हिरावून घेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केला आहे व जिल्ह्यात बोगस कामे करण्याचा सदर प्रयत्न खपवून घेणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासमोर सुद्धा सदर विषय दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना भेट घेऊन मांडणार आहे. व पुढील रणनीती तयार करण्यात येत आहे.व बांधकाम विभागाने नुकताच पूर्वनियोजित टेंडर केलेले एकूण पाच कंत्राट रद्द करावे. अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार,सचिव अरुण मुक्कावार, डॉ. प्रणय खुणे, अरविंद कात्रटवार,नाना नाकाडे, नितीन वायलालवार,धनंजय पडिशाला, सहसचिव राकेश गुब्बावार, अश्विन मेड्डीवार, सहसचिव गौतम अधिकारी, राजू मेहता, अजय तुम्मावार,अरुण निंबाळकर, सुकलाल सरकार, मंगेश देशमुख,मनोज पवार,रमेश गंपावर अजय गोरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
