५ एप्रिल ला विविध मागण्यासाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन वैनगंगा नदीपात्रात

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३१ मार्च)
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन करीत असल्याची माहिती आज कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र राज्य कमिटीचे सचिव पंकज गुट्टेवार,महिला जिल्हध्यक्ष कविता मोहरकर,आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोबरागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत,धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, शहराध्यक्ष सतीश विधाते, देवाजी सोनटक्के यांचे सह अनेक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री तथा सह पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून अजून पर्यंत कुठलीही कारवाई केली नसल्याने वैनगंगेच्या नदीपात्रात ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविणार असल्याची माहिती दिली आहे.
सोबतच गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या विमानतळा करिता सुपीक जमिनी अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वन जमिनीचा वापर करण्यात यावा अशी सुद्धा मागणी केली आहे. कोटगल बॅरेज करिता अधिग्रहित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नसून योग्यता मोबदला देण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात येणार आहे. तसेच मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुराचे थकीत मजुरी सुद्धा त्वरित देण्यात यावी अशी सुद्धा मागणी असणार आहे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण अजूनही कर्जमाफी झालेली नाही ती करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार आहे.
