जाहिरात
ताज्या घडामोडी

विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे – मा. संजय आवटे

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या २३ व्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन संपन्न

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.९ फेब्रुवारी)

ज्या देशात पिण्याचे पाणी डोळे मिटून पीले जाते त्यास विकास म्हणतात. ज्या देशात सार्वजनिक शाळेत आपला मुलगा शिकला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते त्यास विकास म्हणतात. विकासाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे,असे विचार दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक तसेच लेखक व विचारवंत संजय आवटे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे २३ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हाॅल येथे संपन्न झाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ” देश घडविणाऱ्या महापुरुषांची विचारधारा व आम्ही भारताचे लोक ” या विषयावर विचार व्यक्त करताना ते बोलत होते. विचारमंचावर स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील, संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय घोडके, कार्याध्यक्ष संजय मोरे, मुख्य संघटक सुर्यकांत जनबंधू हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरचिटणीस प्रेमानंद मौर्य हे होते.
आपल्या मार्गदर्शनात संजय आवटे पुढे म्हणाले की, आज बुद्धांचा देश निर्बुद्धांचा देश होत चालला आहे. कारण व्यवस्थेला विचार करण्याची भीती वाटते. सजग पिढी घडविणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे. उद्याची पिढी तुम्हाला विचारणार आहे की देश तोडण्याचे काम सुरू होते तेव्हा तुम्ही कोणाबरोबर होता.
ते पुढे म्हणाले; आमच्या महापुरुषांना नव्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. महापुरुषांचे जैव नाते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. जयभीम हा नव्या जगाचा पासवर्ड आहे. जयभीम हा मजबूत किल्लाच नसून देश एकसंघ ठेवण्याची गुरूकिल्ली सुद्धा आहे. ज्याला जयभीम म्हणायला लाज वाटते तो या देशाचा नागरिक असू शकत नाही.माझ्या अकाऊंट मध्ये किती आले, त्यापेक्षा माझ्या मुलाच्या व नातवंडांच्या अकाऊंट मधून किती गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. संवाद हा लोकशाहीचा कणा आहे. विचार मांडण्याचा अधिकार नसेल तर लोकशाही टिकू शकत नाही; असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणातून संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन फुले आंबेडकरी विचारांची कामगार संघटना हीच देशातील कामगारांचे नेतृत्व करेल असा आशावाद व्यक्त केला. आभार प्रदर्शन केंद्रीय उपाध्यक्ष दयानंद हाडके यांनी केले. कार्यकर्ता चर्चासत्रामध्ये सर्व झोन व विद्युत निर्मिती केंद्र शाखा पदाधिकाऱ्यांनी आपल्या शाखांचा आढावा सादर केला. सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वाटचालीच्या पुढील संकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. ठराव वाचन तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर दोन दिवस संपन्न झालेल्या अधिवेशनाची सांगता झाली.
या अधिवेशनात राज्याच्या सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button