शहराच्या हनुमान,राजेन्द्र वार्डातील पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावा,
अन्यथा घेराव आंदोलन, युवक काँग्रेसचे मुख्याधिका-यांना निवेदन
देसाईगंज-ता.प्रतिनिधी
शहराच्या हनुमान व राजेंद्र वार्डात नळाच्या पाण्यातुन नारु सदृश्य व दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत असल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती समोर येताच येथील समस्या तत्काळ मार्गी लावण्या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते.माञ या घटनेस २० दिवसाचा कालावधी लोटूनही समस्या अद्यापही कायम असल्याने देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला असुन समस्या तत्काळ मार्गी लावा अन्यथा घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेल्या निवेदनातुन देण्यात आला असल्याने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज शहराच्या हनुमान व राजेंद्र वार्डात नळाच्या पाण्यातुन नारु सदृश्य व दुर्गंधी युक्त तसेच विंधन विहीरीच्या माध्यमातून दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या संदर्भात देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पाण्याचे नमुने तपासले असता वास्तविकता आढळून आल्याने १६ मार्च २०२१ रोजी संबंधित वार्डातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्या संदर्भात दिलेल्या निवेदनातुन मागणी केली होती.
दरम्यान नगर प्रशासनाने टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केले असता त्यामुळेही समस्या मार्गी न लागता अधिकच उग्र रुप धारण करु लागल्याने नळ योजनेतील ञुटी दुर करुन पाणीपुरवठा सुरळीत सुरु करण्याची मागणी करण्यात आली असता नगर परिषदेच्या कर्मचा-यांनी थातुरमातुर काम करुन पाण्याचे नमुने प्रयोगशाळेतुन तपासणी न करताच पाणी पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिल्याने संतापलेल्या युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांची भेट घेऊन समस्या अवगत करुन दिली.माञ समस्या अद्यापही जैसे थेच असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता येथील पाणी समस्या तत्काळ मार्गी लावा,अन्यथा नगर परिषद कार्यालय घेराव आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला असुन दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची असल्याचे खडसावण्यात आले असल्याने याबाबत मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.
निवेदन मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी वरिष्ठ लिपिक महेश गेडाम यांनी स्विकारले असुन यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदु नरोटे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,युवक काँग्रेस शहर सचिव विवेक गावळे, भूमित मोगरे, गोपाल दिघोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
