वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही लवकरच कल्याणकारी मंडळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
आमदार संजय केळकर यांनी केली होती मागणी

लोकशाही न्युज, (दि,३ जुलै)
वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे, अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत त्याचीही घोषणा लवकरच करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी याबाबतची मागणी केली होती.
लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्वाचा घटक आहे.कामाची पध्दत, कामाची वेळ,अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने गेली पंधरा वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे.
कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रिफ, संभाजी पाटील निलंगेकर, दिलीप वळसे-पाटील व विद्यमान कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने आपला अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र त्यानंतर चार वर्षे झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आमदार संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ही अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करत आहेत.
आमदार संजय केळकर यांनी सध्या सुरू असणार्या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे, या घटकालाही न्याय द्यावा असा आग्रह व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आमदार केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की, वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे. ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षांपासुन करत आहेत. आमदार संजय केळकर हेही चार वर्षांपासुन पाठपुरावा करत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू असे आश्वासन दिले.
घोषणा, अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
¶¶¶
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातुन गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहोत. आमदार संजय केळकर यांनी यावेळीही मागणी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी अशी मागणी करणार आहोत अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य रवींद्र कांबळे, धिरज पंतरगे व ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली.
